नौदलाच्या बिटिंग द रिट्रिटमध्ये चित्तथरारक कसरतींचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 03:40 AM2019-12-05T03:40:58+5:302019-12-05T03:45:01+5:30

नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती, मार्कोस मरीन कमांडोंची प्रात्यक्षिके, तसेच भारतीय व रशियन नौदलाच्या बॅण्ड पथकाचे सादरीकरण यामुळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले.

The thrill of the breathtaking workout in the Navy's Beating the Retreat | नौदलाच्या बिटिंग द रिट्रिटमध्ये चित्तथरारक कसरतींचा थरार

नौदलाच्या बिटिंग द रिट्रिटमध्ये चित्तथरारक कसरतींचा थरार

Next

मुंबई : भारतीय नौदलाने चेतक व सी किंग हेलिकॉप्टर, मार्कोस सैनिक यांची प्रात्यक्षिके गेट वे आॅफ इंडिया येथे जमलेल्या मान्यवरांपुढे सादर करून आपल्या शक्तीची झलक दाखविली व नौदल सप्ताहाचा शानदार समारोप केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, नौदलाच्या पश्चिम कमांडचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल अजित कुमार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. नौदल दिनानिमित्त बिटिंग द रिट्रिट कार्यक्रमाच्या निमित्ताने नौदलाच्या ताकदीचा अंदाज पुन्हा एकदा उपस्थितांना आला. यावेळी गेट वे आॅफ इंडियाला तिरंग्याची रोषणाई करण्यात आली होती.
नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती, मार्कोस मरीन कमांडोंची प्रात्यक्षिके, तसेच भारतीय व रशियन नौदलाच्या बॅण्ड पथकाचे सादरीकरण यामुळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले. बॅण्डवादन आणि सुंदर नृत्याविष्कार, नौदल जवानांचे डोळ्यांचे पारणे फेडणारे संचलन आणि सी कॅडेट कॉर्प्सचे नृत्य ही बिटिंग द रिट्रिट व टॅटू सेरेमनी कार्यक्रमाची वैशिष्ट्ये ठरली.
नौदलाच्या चेतक व सी-किंग हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती पाहून उपस्थितांचा श्वास रोखला गेला. एकाच वेळी दोन ते तीन हेलिकॉप्टर्सनी विविध रचनांमध्ये हवाई कसरती केल्या. गेट वे आॅफ इंडियाच्या मागून सी-किंग हेलिकॉप्टर झेपावले आणि त्यातून दोरीवरून लटकत जवानांनी तिरंगा फडकावला. यावेळी त्यांनी केलेली पुष्पवृष्टी, तसेच लाल-गुलाबी रंगांची उधळण उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेली.
हेलिकॉप्टरवरून दोरीच्या साहाय्याने लटकत जवानांनी दाखविलेल्या कसरती, मार्कोस कमांडोंनी दहशतवादी हल्ला परतविण्याचे व बचाव कार्याचे प्रात्यक्षिक दाखविले. नौदलाच्या बॅण्डपथकाने लयबद्ध आणि शिस्तबद्धरीत्या संचलन केले. नौदल बॅण्डचे सादरीकरण होत असतानाच, ताजमहल पॅलेस हॉटेलच्या टेरेसवर ट्युबुलर बेलच्या वादनाने वातावरणात रंगत आणली. मॅजिकल लाइट टॅटू ड्रमर्स पथकाने वादन करताना अंधाराच्या पार्श्वभूमीवर वाद्यांना लावलेल्या रंगीत दिव्यांची हालचाल दर्शकांना मंत्रमुग्ध करत होती.
१९७१च्या भारत-पाक युद्धादरम्यान ४ डिसेंबर रोजी कराची बंदरावर हल्ल्याचे आॅॅपरेशन ट्रायडन्ट भारतीय नौदलाने राबविले होते. या हल्ल्यातील शौर्याच्या स्मृतिनिमित्त, तसेच नौदलाच्या हुतात्मा जवानांना आदरांजली देण्यासाठी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. आॅपरेशन ट्रायडन्ट दरम्यान रशियन नौदलाचे साहाय्य मिळाले होते. रशियन नौदलाच्या बॅण्ड पथकाने या वर्षीच्या बिटिंग रिट्रिट सोहळ्यात सहभाग घेतल्याने हा सोहळा अधिकच आकर्षक ठरला. कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या मान्यवरांनी कार्यक्रमाची चित्रे, चित्रफिती आपापल्या मोबाइलमध्ये टिपण्याची घाई केल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: The thrill of the breathtaking workout in the Navy's Beating the Retreat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.