Join us  

चोरीसाठी तीन दिवस गटारात राहून तयार केला भुयारी मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 6:24 AM

चोरीसाठी चोर काय शक्कल लावतील याचा नेम नाही.

मुंबई : चोरीसाठी चोर काय शक्कल लावतील याचा नेम नाही. त्यात, पायधुनी येथील ड्रायफ्रूटच्या दुकानातील कोट्यवधीच्या ऐवजावर हात साफ करण्यासाठी झारखंडच्या दुकलीने तीन दिवस गटारात राहून भुयारी मार्ग तयार केला. याच भुयारी मार्गातून ड्रायफ्रूटच्या दुकानात शिरलेही. मात्र, तिजोरीच न उघडल्याने पर्यायी काजू, बदामसह दीड लाखाची रोकड घेऊन त्यांना परतावे लागले. हाती काही न लागल्याने झारखंडला न परतता, दुकली मोठ्या सावजाच्या शोधात असताना पायधुनी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.आलम पैगम शेख (२८), बादुस जिसमुद्दीन शेख (२२) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही झारखंडच्या साहेबगंज जिह्यातील रहिवासी आहेत. आलम हा बिझेसटोला, तर बादुस हा फईमटोला गावचा आहे. या दोन मित्रांनी झटपट पैसे कमाविण्यासाठी गेल्या आठवड्यातच मुंबई गाठली. त्यानंतर त्यांनी चोरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी पायधुनी परिसरात हातगाडी चालवून दुकानांची रेकी करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्यांची नजर ड्रायफ्रूट्स विक्रीचे व्यापारी दिपेन डेडीया (४७) यांच्या दुकानावर पडली. येथून मोठे आर्थिक व्यवहार होत असल्याचे पाहून त्यांनी त्यांचे दुकान टार्गेट केले. त्यासाठी त्यांच्या दुकानापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी नाल्याचा वापर करण्याचे ठरवले. तीन दिवस त्यांनी नाल्यात थांबूनच भुयार खोदले. आवाज येऊ नये यासाठी त्यांनी गोणीचा वापर केला. विशेष म्हणजे याच छोट्या नाल्यातून डेÑनेज लाइन, सांडपाणी सोडले जाते. पण त्यांनी कोट्यधीश होण्याच्या नादात नाल्यात तीन दिवस काढले आणि चार बाय दोन इतक्या आकाराचा त्यांनी खड्डा खणला होता.अथक प्रयत्नानंतर त्यांनी कार्यालयाच्या मागच्या बाजूने २० तारखेला रात्री साडेबाराच्या सुमारास आत प्रवेश करत, घरफोडी केली. मंगळवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला.पायधुनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश कानडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक लीलाधार पाटील, फडतरे, अंमलदार सोलकर, दळवी, माने, सूर्यवंशी, सावंत आणि ठाकूर या पथकाने शोध सुरू केला. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये दोघांचा चेहरा कैद झाला होता. मात्र या परिसरात नवीन असल्याने पोलीस पोहोचणार नाहीत, या आत्मविश्वासाने त्यांनी चेहरा लपवला नव्हता. पोलिसांनी मुंबईसह राज्यभरातील अभिलेखावरील आरोपींच्या माहितीवरून तपास सुरू केला. मात्र, त्यांची माहिती मिळाली नाही. त्यामुळे आरोपींपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.>नातेवाइकाकडे ठेवला चोरीचा मालचोरी करून झारखंड गाठायचे असे असताना, हाती जास्तीचा ऐवज न लागल्याने त्यांनी झारखंडला रवाना न होता येथील एका नातेवाइकाकडे चोरीचा माल ठेवला. नातेवाईक याबाबत अनभिज्ञ होता. त्यांनी पुन्हा हातगाडी चालवून मोठ्या सावजाचा शोध सुरू केला. याच दरम्यान वेश बदलून या परिसरात फिरत असलेल्या तपास पथकाने त्यांना हेरले आणि शनिवारी रात्री उशिराने दोघांनाही अटक केली. रविवारी न्यायालयाने त्यांना २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. चोरीचा मालही पोलिसांनी हस्तगत केला आहे.>चिल्लरसह काजू,बदामवर डल्लातब्बल अडीच तास ते डेडीया यांच्या दुकानातील दोन तिजोरी तोडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तिजोरी न उघडल्याने ड्रॉव्हरमधील दीड लाखाच्या रोकडसह, त्यांनी ४० हजार रुपयांची चिल्लर, काजू, बदाम गोणी भरून नेले.