मुंबई : सप्टेंबर महिन्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी साथीच्या आजारांचे प्रमाण कमी झालेले नाही. सप्टेंबरच्या पंधरवड्यात शहर-उपनगरात साथीच्या आजाराने तीन बळी घेतले असून दोन लेप्टोने तर एका रुग्णाचा स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे. याखेरीज, पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहर-उपनगरात मलेरियाच्या ३१९ रुग्णांची नोंद झाली आहे.त्याचप्रमाणे, १ हजार ५३६ इतक्या रुग्णांमध्ये डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे आढळल्याने त्यांना विविध रुग्णालयांत दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. पीएन वॉर्डमधील १९ वर्षीय महिला आणि के पूर्व वॉर्डमधील ४९ वर्षीय पुरुषाचा लेप्टोने मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीत म्हटले आहे. तर, के पूर्व वॉर्डमधील ६८ वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूमुळे खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. अशावेळी स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक काळजी घेण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने साथीच्या आजारांत वाढ झालेली दिसून येत आहे.वाढत्या साथीच्या आजारांवर प्रतिबंध करण्यासाठी खासगी डॉक्टरांना रुग्णांची प्राथमिक लक्षणे तपासून डॉक्सीसायक्लिन गोळ्या देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली. त्याचप्रमाणे, रुग्णांनीही ताप अंगावर न काढता वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.>१ ते १५ सप्टेंबर २०१९आजार रुग्णसंख्या मृत्यूमलेरिया ३१९ ०लेप्टो २१ २स्वाइन फ्लू ६ १गॅस्ट्रो १९३ ०हेपेटायटिस ५७ ०डेंग्यू १०४ ०
पंधरवड्यात साथीच्या आजारांचे तीन बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 01:50 IST