Join us  

रिक्षाचालकासह तिघांना अंबोलीत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 2:34 AM

वाहनचोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांसह तिघांच्या मुसक्या आवळण्यात अंबोली पोलिसांना गुरुवारी यश आले आहे.

मुंबई: वाहनचोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांसह तिघांच्या मुसक्या आवळण्यात अंबोली पोलिसांना गुरुवारी यश आले आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख दया नायक आणि त्यांच्या पथकाने केली असून दोन पिस्तूल तसेच जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.दीपक प्रजापती (३३), प्रवीण पुजारी (२९) आणि प्रथमेश जाधव (२३) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. यात प्रजापती आणि पुजारी हे दोघे अभिलेखावरील गुन्हेगार आहेत. शीव कोळीवाडामध्ये राहणारा प्रजापती हा २०१५मध्ये कारागृहातून शिक्षा भोगून परतल्यानंतर पुन्हा वाहनचोरीचा आरोप त्याच्यावर होता. तर अ‍ॅन्टॉप हिलचा रहिवासी पुजारी याच्यावर वडाळा टीटी पोलीस ठाण्यात शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा गुन्हा दाखल आहे, अशी माहिती अंबोली पोलिसांकडून देण्यात आली.जाधव हा रिक्षाचालक असून, त्याचे काही रेकॉर्ड पोलिसांना सापडलेले नाही. बुधवारी मध्यरात्री फरार आरोपी अंधेरीच्या वीरा देसाई रोडजवळ येणार असल्याची माहिती नायक यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने सापळा रचला. १२.४५च्या सुमारास एक रिक्षा त्यांना संशयितरीत्या फिरताना दिसली. जी नायक यांच्या पथकाने अडवली. तेव्हा त्यात हे तिघे पोलिसांना सापडले ते चौकशीत उडवाउडवीची उत्तरे त्यांना देत होते. तेव्हा पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली. त्यात दोन पिस्तूले आणि सहा काडतुसे त्यांना सापडली.