Join us  

पालिकेचे १५ दवाखाने आता संध्याकाळीही सुरू, गरीब रुग्णांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 2:49 AM

महापालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत १८६ दवाखान्यांमध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत रुग्णांवर उपचार केले जातात.

मुंबई : पालिकेचे दवाखाने दुपारीच बंद होत असल्याने गरीब रुग्णांची गैरसोय होत होती. बऱ्याच वेळा रुग्णांना नाईलाजास्तव खासगी दवाखान्यांमध्ये महागडा उपचार घ्यावा लागत होता. त्यामुळे पालिकेचे दवाखाने संध्याकाळीही सुरू ठेवण्याची मागणी वारंवार नगरसेवकांकडून केली जात होती. त्यानुसार, पालिका प्रशासनाने १५ निवडक दवाखाने दु. ४ ते रात्री ११ या वेळेत खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी संस्थेच्या माध्यमातून हे दवाखाने सुरू ठेवण्यात येणार आहेत.महापालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत १८६ दवाखान्यांमध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत रुग्णांवर उपचार केले जातात. त्यामुळे सकाळच्या वेळेत दवाखान्यात रुग्णांची गर्दी होते. याचा परिणाम दवाखान्यातील सेवेवर होत असतो. सकाळच्या वेळेत बहुतांशी मुंबईकर कामावर जात असल्याने त्यांना पालिकेच्या दवाखान्यात उपचार घेणे शक्य होत नाही. परिणामी, भरमसाठ शुल्क परवडत नसतानाही अनेकांना संध्याकाळी कार्यालयातून आल्यानंतर खासगी दवाखान्यात उपचारासाठी जावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी पालिकेचे दवाखाने संध्याकाळच्या वेळेतही सुरू ठेवण्याची मागणी नगरसेवकांकडून केली जात होती.यानुसार, १८६ दवाखान्यांपैकी १५ निवडक दवाखाने दुपारी ४ ते रात्री ११ या वेळेत उपचारासाठी खुले राहणार आहेत. या प्रत्येक दवाखान्यात एक वैद्यकीय अधिकारी आणि सर्व प्रकारचे काम करणारा कामगार असे दोन मनुष्यबळ खासगी संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार आहेत. तूर्तास या दवाखान्यांमध्ये कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही. त्यामुळे खासगी दवाखान्यातील डॉक्टरांकडून सुरू असलेली लूट थांबणार आहे. रुबी अलकेअर सर्व्हिस प्रा.लि. या संस्थेमार्फत ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे.

टॅग्स :हॉस्पिटल