तीन बाइक रायडर्सनी केला अडीच लाख किलोमीटरचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 02:32 AM2019-08-13T02:32:43+5:302019-08-13T02:33:07+5:30

सरासरी अडीच लाख किलोमीटर बाइकवरून प्रवास करणारे बाइक रायडर्स आदित्य फडके, दीप्ती फडके आणि जयंत चितळे या तीन तरुण साहसी प्रवाशांनी दृक्श्राव्य माध्यमातून चित्तथरारक अनुभव नागरिकांसमोर उलगडला.

The three bike riders traveled two and a half million kilometers | तीन बाइक रायडर्सनी केला अडीच लाख किलोमीटरचा प्रवास

तीन बाइक रायडर्सनी केला अडीच लाख किलोमीटरचा प्रवास

Next

मुंबई : सरासरी अडीच लाख किलोमीटर बाइकवरून प्रवास करणारे बाइक रायडर्स आदित्य फडके, दीप्ती फडके आणि जयंत चितळे या तीन तरुण साहसी प्रवाशांनी दृक्श्राव्य माध्यमातून चित्तथरारक अनुभव नागरिकांसमोर उलगडला. साहसी प्रवासादरम्यान तिन्ही बाइक रायडर्सनी वन्यजीव संरक्षण आणि दुचाकीवरील सुरक्षा या विषयांवर देशभर जनजागृती केली. विलेपार्ले पूर्वेकडील लोकमान्य सेवा संघ, पारले, सी.म. जोशी दिलासा केंद्र आणि इंदिरा तिनईकर युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साहसी प्रवास’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
बाइक रायडर जयंत चितळे यांनी यासंदर्भात सांगितले की, अडीच लाख किलोमीटरचा प्रवास हा आम्ही तिघांनी मिळून केला आहे. माझा स्वत:चा यात एक लाख दहा हजार किलोमीटरचा प्रवास असेल. शाळेचे मित्र एकत्र भेटलो की, दुचाकीवरून फिरायला जायचो. पहिले लक्ष्य एकच होते की आपापल्या दुचाकीवरून गोव्याला जाणे, यासाठी आम्ही पहिल्यांदा महाबळेश्वरला गेलो. त्यानंतर नोव्हेंबर २००८ रोजी गोव्याला गेलो. मग इथून साहसी प्रवासाला सुरुवात झाली. ईशान्य भारतातील काही भाग सोडला तर आतापर्यंत संपूर्ण भारत दुचाकीवरून पिंजून काढला आहे. एकंदरीत कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास पूर्ण झाला. आता कच्छ ते आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम हा प्रवास बाकी आहे.

अशी केली जनजागृती
आम्ही जेव्हा जीम कॉर्बेटला गेलो, तेव्हा ‘सेव्ह टायगर’बाबत जनजागृती केली. २००९ साली वाघांच्या मृत्यूचे प्रमाण खूप होते. मुंबईवरून निघाल्यावर ज्या ज्या ठिकाणी आम्ही थांबत होतो, तेथे ‘सेव्ह टायगर’बाबत जनजागृती केली.

पुढच्या वर्षी नेपाळ प्रवास
२००८ साली ‘रोड स्टॅलियन्स’ क्लबची स्थापना झाली. साहसी प्रवासाला चार तरुणांनी मिळून सुरुवात केली. क्लबमध्ये १७० जण असून १८ ते ६३ वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांचे एकच लक्ष्य आपल्या दुचाकीवरून संपूर्ण जग फिरायचे. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात नेपाळ राइडवर जाणार आहे.

Web Title: The three bike riders traveled two and a half million kilometers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.