कल्याण : विवस्त्र करून मारहाण केल्याच्या आरोपाची चौकशी सहाय्यक आयुक्तांमार्फत सुरू झाली असून यासंदर्भातला अहवाल पोलीस उपायुक्त संजय जाधव यांना सादर केला जाणार आहे. पोलीस ठाण्यात हाणामारी करून गोंधळ घालणाऱ्या तरूणी आणि महिलांविरोधात पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, धमकाविणे, मारहाण असे गुन्हे दाखल केले आहेत. परस्पर विरोधी दाखल झालेल्या तक्रारीवरून रविवारी पोलीस ठाण्यातच हाणामारीचा प्रकार काही तरूणी आणि महिलांमध्ये घडला होता. यावेळी पुरूष पोलिसांनी विवस्त्र करून मारहाण केल्याचा आणि व्हिडीओ क्लिप काढून ती प्रदर्शित करण्याची धमकी दिल्याचा आरोप पिडीत तरुणींनी केल्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दरम्यान तरूणींच्या आरोपावरून चौकशी करण्याचे आदेश उपायुक्त जाधव यांनी दिले होते़ त्यानुसार सहाय्यक आयुक्त चंद्रकांत थोरात यांनी चौकशीला सुरूवात केली आहे.
‘त्या’गंभीर आरोपांची चौकशी सुरू
By admin | Updated: December 25, 2014 00:07 IST