म्हारळ : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील शहाड येथे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दुकान फोडणे, दुचाकी चोरणे असे प्रकार रोज रात्री होऊ लागले आहेत. चोरट्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. शहाड स्टेशनजवळील नवरंग सोसायटीतील मनोज प्रोव्हिजन स्टोअरमधून शनिवारी रात्री पाच हजार रुपयांची रोकड चोरीला गेली. त्याच सोसायटीतील एक अॅक्टिव्हा चोरीस गेली असून, दोन औषधांच्या दुकानांनाही चोरट्यांनी लक्ष्य केले होते. अगदी शहाड स्टेशनला लागून असलेल्या सोसायटीमधून ही मोटारसायकल दोन चोरट्यांनी चोरी केली आहे. पेट्रोलिंग होत नसल्यामुळे चोरांचे फावले असल्याचे येथील रहिवासी सांगतात.शहाड स्टेशनवरही चोरीचे प्रकारशहाड स्टेशनवरही चोरीचे अनेक प्रकार घडत असून चोरटे गाडी सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रवाशांच्या हातातील मोबाइल आणि पर्स खेचून पळून जातात. अशाच एका प्रकारात प्रवाशास आपला जीव गमवावा लागण्याची वेळ आली होती. इंद्रसिंह माला हा आंबिवली येथे राहणारा युवक शहाड स्टेशनवर हातात मोबाइल घेऊन बसला असता गाडी सुरू होताच एका व्यक्तीने त्याच्या हातातील मोबाइल हिसकावून विरुद्ध बाजूला उडी मारली. तो पळू जाऊ लागला असता त्याला पकडण्यासाठी त्यांनी फलाटावर उडी मारली़ परंतु गाडीचा वेग वाढल्यामुळे त्यांच्या तोंडाला मार लागला. तेवढ्या काही मिनिटांच्या फरकामध्ये एका महिलेचीही पर्स चोरट्यांनी लांबवल्याचे त्याने सांगितले. हे चोरटे जवळच्याच परिसरात राहत असल्याची शंका प्रवाशांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
शहाडमध्ये चोरांचा सुळसुळाट
By admin | Updated: October 6, 2014 12:00 IST