Join us  

‘त्यांना’ अंत्यविधीचे पैसेही मिळेनात!

By admin | Published: March 30, 2015 12:42 AM

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी शासनाकडून १५ दिवसांत

मुंबई : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी शासनाकडून १५ दिवसांत पाच हजार रुपये देण्याची तरतूद आहे. मात्र सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील वीसहून अधिक बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना अर्ज केल्यानंतरही गेल्या आठ महिन्यांपासून आर्थिक मदतीसाठी सरकार दरबारी खेटे घालावे लागत आहेत.मंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीचे पाच हजार आणि मृत्यू झालेल्या कामगाराच्या वारसाला दोन लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळते. त्यासाठी मृत कामगाराच्या कुटुंबाला मंडळाकडे अर्ज करावा लागतो. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून हजारो कुटुंबे आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मंडळाने त्यातील एकही अर्ज मंजूर केला नसल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना समन्वय समितीने केला आहे.समन्वय समितीच्या म्हणण्यानुसार, आजघडीला राज्यात सव्वा कोटींहून अधिक बांधकाम कामगार आहेत. त्यातील केवळ २ लाख ८६ हजार कामगारांचीच नोंदणी मंडळात झालेली आहे. नोंदणी केलेल्या कामगारांमधील निम्म्या कामगारांनाही मंडळाच्या योजनांचा लाभ होत नाही. मंडळाकडे कामगारांच्या हितासाठी उपकरामधून ४ हजार २७२ कोटी रुपये जमा झालेले आहेत. मात्र गेल्या चार वर्षांत त्यातील केवळ १५६ कोटी रुपये कामगारांसाठी खर्च करण्यात आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे १५६ कोटींपैकी ७० कोटींहून अधिक रक्कम ही मंडळाने कामगारांसाठी सुरू केलेल्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी जाहिराती व कार्यक्रमावर खर्च केलेले आहेत.