Join us  

नगरसेवकांच्या विषयनिहाय कामांची वर्गवारी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 1:08 AM

प्रशासन आपल्या दारी; कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला जाणार

मुंबई : रस्ते, शौचालये, पाणी, नाले, गटारे आणि वीज अशा मूलभूत समस्या सोडविण्यासह प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता मुंबईकरांच्या नाकीनऊ येतात. विशेषत: मूलभूत समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांची मदत घेतली तरी त्या समस्या पूर्णत: सुटत नाहीत. अनेक प्रश्न विविध प्राधिकरणांच्या अखत्यारित असतात, किंवा मुंबई महापालिकेच्या विविध विभागांशी संबंधित असतात. अशा वेळी मुंबईकरांना मनस्ताप तर होतोच; शिवाय वेळही वाया जातो. परिणामी यावर उपाय म्हणून आता ‘प्रशासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नगरसेवकांच्या विषयनिहाय कामांची वर्गवारी करण्यात येणार असून, प्रश्न सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे.मुंबई महापालिकेच्या ‘प्रशासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नगरसेवकांच्या विषयनिहाय कामांची वर्गवारी करणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्य शासन, वनविभाग, उपनगरे जिल्हाधिकारी खाते यासंबंधीच्या विषयांची एक वर्गवारी, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए यांची दुसरी वर्गवारी, महापालिका मुख्यालयातील प्रश्नांची तिसरी वर्गवारी, तर स्थानिक प्रश्नांची चौथी वर्गवारी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे हे सर्व प्रश्न कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून सोडविण्यात येणार आहेत. तर काही प्रश्न उपआयुक्त व विभाग स्तरावर सोडविले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी सूचविलेले तलाव ताब्यात घेऊन त्यांचे सौंदर्यीकरण करणे, स्मशानभूमीची प्रलंबित कामे पूर्ण करणे, अपूर्ण पुलांचे काम पूर्ण करणे, नाल्यांमधील गाळ काढणे, कचरा वर्गीकरण करून विद्युतनिर्मिती प्रकल्प राबवणे, आनंदनगर झोपडपट्टीचा विकास करणे, सायकल ट्रॅकचे काम सुरू करणे, जेव्हीएलआरची कामे मार्गी लावणे, सर्वेक्षणासाठी निधी उपलब्ध करून देणे, महाकाली गुंफा परिसराचे सुशोभिकरण, डायलिसीस सेंटरसाठी प्रस्ताव सादर करणे, मोगरा व मजास नाल्यांचे रुंदीकरण, रस्त्यांचे रुंदीकरण, तसेच मलजलवाहिनी टाकण्याची कामे सुरू करणे आदी सूचना महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला केल्या आहेत.सर्व यंत्रणांची बैठकबहुंताश प्रश्न हे उपनगरे जिल्हाधिकारी, झोपडपट्टी विकास प्राधिकरण, एमएमआरडीए यांच्याशी संबंधित असतात. या सर्व प्रश्नांची यादी तयार करून संबंधित सर्व यंत्रणांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. जेणेकरून प्रलंबित प्रश्न सोडविण्यास मदत होऊ शकेल.‘संरक्षणाच्या दृष्टिकोनातून पथदिवे लावा’महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये महिलांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून पथदिवे लावण्याची सूचना महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. जे धोकादायक पूल आहेत या पुलांची कामे राखीव निधीमधून तातडीने हाती घेण्याची सूचनाही महापौरांनी केली आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका