मोनो डब्यांच्या रेखांकनासाठी पडणार अतिरिक्त आर्थिक भार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 02:49 AM2020-01-13T02:49:09+5:302020-01-13T02:49:30+5:30

एमएमआरडीएसमोर पेच : नव्याने डबे बनविण्यासाठी रेखांकन गरजेचे

There will be additional financial burden for drawing mono boxes | मोनो डब्यांच्या रेखांकनासाठी पडणार अतिरिक्त आर्थिक भार

मोनो डब्यांच्या रेखांकनासाठी पडणार अतिरिक्त आर्थिक भार

Next

मुंबई : आधीच तोट्यामध्ये धावत असलेल्या मोनोचा पुढील मार्ग आणखीनच खडतर बनला आहे. मोनोच्या डब्यांचे रेखांकन करणारी स्कोमी कंपनी दिवाळखोरीत गेल्याने आणि इतर कंपन्यांचे रेखांकन सध्या धावत असलेल्या मोनोमार्गासाठी योग्य नसल्याने, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासमोर (एमएमआरडीए) मोठा पेच निर्माण झाला आहे. आता नव्याने रेखांकन करून मोनोचे डबे बनविण्यासाठी जास्त उत्पादन्न खर्च एमएमआरडीएला उचलावा लागणार आहे.

वडाळा ते चेंबूर हा मोनोरेलचा पहिला टप्पा फेब्रुवारी, २०१४ मध्ये सुरू करण्यात आला, तर वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा मोनोचा दुसरा टप्पा मार्च, २०१९ मध्ये कार्यन्वित करण्यात आला. मोनोच्या एकूण १९.५४ कि.मी. मार्गावर सतरा मोनो स्थानके आहेत. सध्या मोनोच्या ताफ्यात १० गाड्या आहेत, पण यातील सहा गाड्या नादुरुस्त असून, एक गाडी राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अवघ्या तीन गाड्यांच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा पुरवताना प्रशासनाची तारांबळ उडत आहे. त्यातच या नादुरुस्त गाड्यांचे सुटे भाग मिळविण्यात अडचणी येत असल्याने मोनोच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे मोनो ज्या मार्गावरून धावते, त्या मार्गाला अनुरूप नव्या गाड्यांची बांधणी करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.

मोनोची बांधणी करणाऱ्या मलेशियन स्कोमी कंपनी आणि इतर कंपन्यांची मार्ग आणि डब्यांच्या बांधणीची पद्धत ही वेगवेगळी आहे. त्यामुळे इतर कंपन्यांकडून सध्या अस्तित्वात असणाºया मार्गाप्रमाणे डब्यांची किंवा गाड्यांची बांधणी करण्याचा निर्णय घेतल्यास रेखांकन करणे गरजेचे आहे, पण हे रेखांकन करून सध्या उपलब्ध असलेली यांत्रिक पद्धत बदलत डब्यांची निर्मिती करण्यासाठी अतिरिक्त खर्चाची मागणी या कंपन्यांकडून होत आहे, अशी माहिती आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिली. परिणामी, रेखांकनाच्या रूपाने एमएमआरडीएसमोर एक नवा पेच निर्माण झाला आहे.

सुट्या भागांच्या कमतरतेमुळे कार्यक्षमतेवर परिणाम
मोनोच्या सुट्या भागांच्या करमरतेमुळे मोनोरेलच्या एकंदरीत कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे एमएमआरडीएने मान्य केले आहे. चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक अशी मोनो सुरू आहे. मात्र, या दोन्ही मार्गांवर सध्या तीनच मोनो धावत असल्याने, तब्बल २५ मिनिटांची वाट प्रवाशांना पाहावी लागत आहे. या मार्गावर मोनो वाढविण्याची वारंवार मागणी प्रवाशांकडून होत आहे. मात्र, नादुरुस्त मोनो दुरुस्त करण्यासाठी सुट्या भागांची गरज असते. मात्र, हे सुटे भागही लवकर उपलब्ध होत नाहीत. पुणे किंवा अन्य ठिकाणांहून ते मागवावे लागतात, त्यात बराच काळ जातो. या अडचणींमुळे मोनोच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे.

Web Title: There will be additional financial burden for drawing mono boxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.