Join us  

...तर ‘बेस्ट’चे अवशेषच शिल्लक राहतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 4:45 AM

बेस्ट सेवा ढासळवण्याचे प्रयत्न नियोजनपूर्वक सुरू आहेत. त्यामुळे एकेकाळी अत्यंत उत्कृष्ट समजली जाणारी ही सार्वजनिक वाहतूक सेवा नष्ट होत तिचे फक्त अवशेष शिल्लक राहतील

मुंबई : बेस्ट सेवा ढासळवण्याचे प्रयत्न नियोजनपूर्वक सुरू आहेत. त्यामुळे एकेकाळी अत्यंत उत्कृष्ट समजली जाणारी ही सार्वजनिक वाहतूक सेवा नष्ट होत तिचे फक्त अवशेष शिल्लक राहतील, अशी भीती सार्वजनिक वाहतूक सेवांच्या संदर्भात काम करणाऱ्या ‘आमची मुंबई आमची बेस्ट’ या नागरिक मंचाने व्यक्त केली आहे.बेस्टने बस सेवेचे मासिक पास देण्याचे बंद केले आहे. याचे कारण म्हणजे त्यासाठी आवश्यक इ-टिकीटिंग मशीनचा तुटवडा असल्याने स्मार्ट कार्ड वितरित करता येत नाहीत. त्यामुळे जे प्रवासी नियमितपणे पासावर अवलंबून आहेत; त्यांना बसचे वाढीव दर परवडेनासे झाले आहेत. त्यामुळे अधिकाधिक प्रवासी बेस्टपासून दूर जात आहेत. ज्या विकासकांना बेस्टने अनेक डेपोंच्या पुनर्विकासाचे हक्क दिले होते, त्यांच्याकडून सुमारे ३५० कोटी रुपये गेल्या एक वर्षाहून अधिक काळ बेस्टने वसूलच केलेले नाहीत. बेस्टच्या व्यवस्थापनाने बेस्टच्या विद्युत वितरण विभागाला बेस्टपासून वेगळे करून कंपनी कायद्यानुसार वेगळी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. बेस्टच्या विद्युत वितरण विभागाकडून वाहतूक विभागाला क्रॉस सबसिडी दिली जात नाही. त्यातून या दोन विभागांना वेगळे केल्यामुळे दैनंदिन रोख रकमेच्या नियोजनातही समस्या निर्माण होणार आहे.निवेदनात बेस्टने जाहीर केले होते की, मेट्रो आणि मोनो रेल्वेला समांतर मार्गावरील बससेवा कमी करण्यात येतील व या रेल्वेला फिडर सेवेमध्ये त्याचे रूपांतर करण्यात येईल. परंतु, ज्यांना मेट्रो परवडत नाही अशा प्रवाशांना स्वस्त पर्याय उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. बेस्टने सुमारे १/५ मार्गावरील सेवा बंद केली आहे. बसेसच्या ताफ्यात ९०० बसची घट केली.बेस्टने वारंवार केलेली दरवाढ ग्राहक किंमत निर्देशांकाच्या तुलनेत किती तरी अधिक आहे. दरम्यान, एका ठरावीक टप्प्यानंतर बेस्ट सेवेचे हे आकुंचन या सेवेला मारक ठरणार आहे. चांगल्या बस सेवेविना हे शहर प्रदूषण, वाहतूककोंडी आणि अकल्याणकारी सार्वजनिक व्यवस्था यांचे बळी ठरणार आहे. त्यामुळे महापालिका आणि बेस्ट प्रशासनाने शहराची बेस्ट सेवा पूर्वीसारखीच सक्षम करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी आमची मुंबई आमची बेस्टच्या वतीने करण्यात आली आहे.>नागरिकांना आंदोलनासाठी प्रवृत्त केले जातेआमची मुंबई आमची बेस्टतर्फे ‘बेस्टसाठी जनतेचा आराखडा’ सादर केला होता. त्या आराखड्यात काही सूचनांबरोबर जनतेवर भार न टाकता बेस्टसाठी आवश्यक निधी कसा निर्माण करता येईल हे दाखवले होते. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असून बेस्ट वाचविण्यासाठी नागरिकांना आंदोलन छेडण्यास प्रशासन प्रवृत्त करत आहे.