लाल फुल्ल्यांच्या प्रतीक्षेत नाट्यगृहांची तिकीटबारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 12:20 AM2020-10-28T00:20:23+5:302020-10-28T00:21:26+5:30

Navi Mumbai News : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून नाट्यगृहांवर पडदा पडल्याने, नाट्यव्यवसाय पूर्णतः ठप्प झाला आहे. नाटकांतून भूमिका रंगवणाऱ्या कलावंतांसह, पडद्यामागच्या कलाकारांची आर्थिक स्थिती रोडावल्याने त्यांचे हाल बेहाल झाले आहेत.

Theatrical ticket waiting for red Marks! | लाल फुल्ल्यांच्या प्रतीक्षेत नाट्यगृहांची तिकीटबारी!

लाल फुल्ल्यांच्या प्रतीक्षेत नाट्यगृहांची तिकीटबारी!

Next

- राज चिंचणकर 
मुंबई : कागदावर लाल फुल्लीचा शिक्का बसणे सर्वसाधारणपणे चांगले समजले जात नाही. मात्र, नाट्य व्यवसायाच्या दृष्टीने याच लाल फुल्ल्या महत्त्वाचे स्थान राखून आहेत. नाट्यगृहांच्या तिकीटबारीवर मांडल्या जाणाऱ्या आसनव्यवस्थेच्या तक्त्यावर (प्लॅन) लाल फुल्ल्या जितक्या जास्त; तितके त्या नाटकाचे नशीब थोर समजले जाते. सध्या तिकीटबारीवरचा हा प्लॅन पार कोरा झाला असून, त्यावर लवकरच लाल फुल्ल्या उमटण्याची नाट्यसृष्टीला प्रतीक्षा आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून नाट्यगृहांवर पडदा पडल्याने, नाट्यव्यवसाय पूर्णतः ठप्प झाला आहे. नाटकांतून भूमिका रंगवणाऱ्या कलावंतांसह, पडद्यामागच्या कलाकारांची आर्थिक स्थिती रोडावल्याने त्यांचे हाल बेहाल झाले आहेत. नाटकाच्या प्रत्येक प्रयोगावर या सगळ्या चमूचे पोट अवलंबून असते. या काळात काही संस्थांनी या मंडळींना आर्थिक मदतीचे वाटप केले असले, तरी नाट्यव्यवसाय सुरु झाल्याशिवाय रंगकर्मी आणि पडद्यामागच्या या कलाकारांची गाडी खऱ्या अर्थाने रुळावर येणे कठीण आहे. 

दरवर्षी ऐन दसरा-दिवाळीचे मुहूर्त साधून अनेक नवीन नाट्यकृती रंगभूमीवर येत असतात. मात्र याला यंदाचे वर्ष अपवाद ठरत आहे. दसऱ्याचे औचित्य साधून नाट्यव्यवसायावर उपजीविका असणाऱ्या काही मंडळींकडून तिकीटबारीवरच्या लाल फुल्ल्यांनी न भरलेल्या आसनव्यवस्थेच्या कोऱ्या तक्त्याची पूजा करून, नाट्यव्यवसाय लवकर सुरु होऊ दे, असे गाऱ्हाणे यंदा घालण्यात आले. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी जे तक्ते लाल फुल्ल्यांनी भरलेले असतात, तिथे यंदा कोरे तक्ते पाहण्याची वेळ नाट्यसृष्टीवर ओढवली. हे सर्व दुष्टचक्र लवकर संपून, रंगभूमीचा पडदा दिमाखाने वर सरकण्याकडे तमाम नाट्यसृष्टीचे लक्ष आता लागून राहिले आहे. 
 

Web Title: Theatrical ticket waiting for red Marks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.