Join us  

‘निधी’वाटपात सत्ताधारी नगरसेवक जोमात, तर विरोधी पक्षाचे मात्र कोमात! 

By जयंत होवाळ | Published: February 21, 2024 10:07 AM

निधीच्या बाबतीत सत्ताधारी जोरात, तर विरोधी पक्ष कोमात, अशी परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे.

जयंत होवाळ, मुंबई : निधी वाटपावरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी, काँग्रेस, समाजवादी पक्ष या पक्षांचे माजी नगरसेवक जेरीस आले असून, सत्ताधारी गटातील माजी नगरसेवकांच्या वॉर्डात मात्र कामे जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे निधीच्या बाबतीत सत्ताधारी जोरात, तर विरोधी पक्ष कोमात, अशी परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे.

सत्तांतर, शिवसेना, राष्ट्रवादीतील फूटीमुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी, काँग्रेस, समाजवादी पक्षांच्या नगरसेवकांची फरफट होत असल्याचे जाणवते. पालकमंत्र्यांच्या शिफारशीवरून आमदारांना निधी मिळत आहे, हा निधी त्यांचे आमदार आपल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या वॉर्डात वळवत आहेत, आमच्या आमदारांना निधी दिला जात नाही. वॉर्डात निधीचा ठणठणाट आहे, कामे रखडवली जात आहेत, असा  नगरसेवकांचा सूर आहे.

वॉर्डांसाठी तीन कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यातून मी तांबेनगरमधील रस्ता बनवला. बसस्टॉपचे काम केले. शौचालयांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत.- प्रकाश गंगाधरे, ज्येष्ठ नगरसेवक, भाजप

कोणती कामे रखडली :

लादीकरण, पाण्याची लाईन, शौचालयांची  दुरुस्ती आदी कामे रखडली आहेत, निधी मिळावा म्हणून दीड वर्षापूर्वी  प्रशासनाला पत्र दिले; पण निधी मिळाला नाही, अशी भावना बोलून दाखवली.

पक्षांतरासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न :

विक्रोळीचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. विकासकामांसाठी पाच कोटींचा निधी मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले. ‘मनसे’चे एकमेव माजी नगरसेवक संजय तुरडे यांनीही आमच्या वॉर्डातील कामे निधीअभावी रखडली आहेत, असे सांगितले. भरीस भर म्हणून पक्षांतर करा, असा दबाव टाकण्याचा प्रयत्न  केला जात आहे, असेही ते म्हणाले. 

विरोधी पक्षांच्या नगरसेवकांची मात्र कामे रखडवली :

१) पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी निधी अभावी लादीकरण, पाण्याची लाईन, शौचालयांची  दुरुस्ती आदी कामे रखडली आहेत, निधी मिळावा म्हणून दीड वर्षापूर्वी  प्रशासनाला पत्र दिले; पण निधी मिळाला नाही, अशी भावना बोलून दाखवली. 

२)  राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी तर, आमच्याकडे आलात तर कामे होतील, असाच सत्ताधाऱ्यांचा रोख असल्याचे सांगितले. सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते-पदाधिकारी जी कामे काढतात ती लगेच मार्गी लावली जातात.   एकप्रकारे आमच्याकडूनच  कामे होऊ शकतात, असे दाखवण्याचा  प्रयत्न केला जात आहे. विरोधी पक्षांच्या नगरसेवकांची मात्र कामे रखडवली जात आहेत, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :मुंबईनगर पालिका