Join us  

‘सुपरस्पेशालिटी’कडे पाठ

By admin | Published: January 31, 2015 2:29 AM

महापालिकेने मोठा गाजावाजा करून वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात हिरानंदानी, फोर्टीजच्या सहयोगाने सुपरस्पेशालिटी उपचारांची सुविधा उपलब्ध केली आहे

नामदेव मोरे, नवी मुंबईमहापालिकेने मोठा गाजावाजा करून वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात हिरानंदानी, फोर्टीजच्या सहयोगाने सुपरस्पेशालिटी उपचारांची सुविधा उपलब्ध केली आहे. परंतु पाच वर्षांत ८६१८ रुग्णांनीच या उपचारांचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे गरीब रुग्णांना याचा अजिबात लाभ झालेला नसून, उपचारांचे दर पाहून कोणीही तिकडे फिरकत नाही. नवी मुंबईमधील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या नागरिकांना सुपरस्पेशालिटी उपचारांची सुविधा मिळावी यासाठी पालिकेने वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील १ लाख २० हजार चौरस फूट जागा हिरांनदानी रुग्णालयास दिली आहे. फक्त ४ रुपये ५० पैसे प्रतिचौरस फूट एवढ्या कमी दराने ही जागा भाड्याने दिली आहे. या बदल्यामध्ये संबंधित रुग्णालयात १० टक्के बेड पालिकेने पाठविलेल्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार व त्यांच्यावर मोफत उपचार होणार असे सुरवातीला सांगण्यात आले होते. परंतु करार करताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी चुका केल्या. झालेला करार रुग्णालयाच्या हिताचा व पालिकेचे नुकसान करणारा ठरला. हिरानंदानीने सदर जागा फोर्टीजला विकली व तेथे आता फोर्टीज व्यवस्थापन हॉस्पिटल चालवत आहे. १० टक्के रुग्णांवर मोफत उपचार नाही तर फक्त बेडच्या फी व डॉक्टरांच्या सल्ल्यातून सूट मिळाली. पालिकेने जून २०१० पासून रुग्ण पाठविण्यास सुरवात केली. परंतु हिरानंदानी, फोर्टीज रुग्णालयामधील उपचारांचा खर्च सामान्य नागरिकांना परवडत नाही. अनेक वेळा एक किंवा दोन दिवसांसाठीचे बिल लाखामध्ये जाते. यामुळे रुग्णालय प्रशासनही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांना सुपरस्पेशालिटीचा पर्याय सांगतच नाहीत. मागील साडेचार वर्षात ८६१८ रुग्ण सुपरस्पेशालिटी उपचारासाठी संदर्भीत केले आहेत. यामध्ये ५९३३ रुग्ण ओपीडीसाठी व फक्त २६८५ रुग्ण अ‍ॅडमीट करण्यात आले असल्याचे आरटीआयच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. सुपरस्पेशालिटी उपचाराचा लाभ घेतलेल्या रुग्णांची संख्या धक्कादायक आहे. रोज दोन रुग्णांनाही या योजनेचा लाभ झालेला नाही. ज्यांनी महापालिकेच्या कोट्यातून हिरानंदानीमध्ये लाभ घेतला त्यामध्ये गरीब रुग्णांचा समावेश आहे. मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय नागरिकच या योजनेचा लाभ घेत आहेत. कारण पालिकेने संदर्भीत केल्यास बेडचे भाडे व डॉक्टरी सल्ला तरी फुकट मिळत असून बिलामध्ये हजारो रुपयांची बचत होत आहे. परंतु गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्याच्या उद्देशाने अत्यंत अल्प किमतीमध्ये पालिकेने मोक्याची जागा खाजगी रुग्णालयास दिली. मूळ उद्देश असफल झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या व मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यास अपयश आले आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका प्रशासन, माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनीही वारंवार पाठपुरावा केला. विरोधकांनी वारंवार या विषयावर आवाज उठविला, परंतु अद्याप हा प्रश्न सुटू शकलेला नाही.