नरेंद्र रानडे- सांगली -एखाद्या विक्रीयोग्य वस्तूची माहिती सतत कानावर पडत राहिली, तर तीच वस्तू विकत घेण्याकडे अनेकांचा कल असतो, हे सर्वसाधारण मानसशास्त्र आहे. याचा फायदा अनेकजण घेतात. महागाईच्या काळात ‘ब्रॅँडेड’ औषधांच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर चालल्या आहेत. त्याला पर्याय म्हणून ‘जेनेरिक’ औषधे बहुतांशी सर्वच औषध दुकानांतून उपलब्ध आहेत. परंतु गैरसमजुतीमुळे ही औषधे घेण्याकडे रुग्णांचा कल कमी असल्याचे चित्र आहे. बहुतांश रुग्णांचा विश्वास ‘फॅमिली डॉक्टरां’वरच असतो. साहजिकच त्यांनी लिहून दिलेली औषधे घेण्यालाच ते प्राधान्य देतात. परंतु औषध दुकानात ‘जेनेरिक’ हा प्रकार उपलब्ध असतो आणि ती औषधे खिशाला परवडतील अशा दरात उपलब्ध असतात. परंतु डॉक्टरांनी ती लिहून दिली असल्याने औषध विक्रेत्यांनी सांगूनही ती औषधे घेण्यास नकार दिला जातो, असे सर्रास पहावयास मिळते. जेनेरिक म्हणजे काय?जेनेरिक औषध म्हणजे मूळ औषध किंवा औषधाचे मूळ नाव. बाजारात असलेल्या विविध कंपन्या त्या औषधाला स्वत:चे ‘ब्रॅँडनेम’ देऊन त्याची विक्री करतात. साहजिकच प्रत्येक कंपनीनुसार एकाच औषधाच्या दरात तफावत आढळते. बहुतांशी सर्वच रोगांवर जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत. ‘ब्रॅँडेड’ औषधे घेण्याकडेच कलजेनेरिक औषधांची कोठेही जाहिरात केली जात नाही. परिणामी सामान्यांना त्या औषधांची नावे माहीत नसतात. याउलट ‘ब्रॅँडेड’ कंपन्यांचे आहे. यांच्यापासून निर्मित औषधांची नावे कानावर सतत पडत असतात. त्यामुळे अनेकांचा कल ‘ब्रॅँडेड’ कंपन्यांची औषधे घेण्याकडेच असतो. जेनेरिक व ब्रँडेड औषधांचे गुणधर्म एकच असतात. तरीही समान गुणधर्म असलेलीच, परंतु वेगळ्या कंपन्यांची औषधे घेतली, तर आरोग्यावर परिणाम होईल, असा विचार मनात डोकावतो. परिणामी खिशाला आर्थिक फटका बसतो. ‘ब्रँडेड’ कंपन्यांच्या तुलनेत ‘जेनेरिक’ औषधे ३० ते ४० टक्के स्वस्त मिळतात. खर्चात बचत होण्याकरिता रुग्णांनी ‘फॅमिली डॉक्टर’शी सल्लामसलत करून जेनेरिक औषधे घेण्यास प्रारंभ केल्यास अनावश्यक खर्च वाचण्यास मदत होऊ शकते. किंमत कमी असण्याचे कारणप्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. ‘ब्रॅँडेड’ कंपन्यांना करावी लागणारी जाहिरातबाजी, त्यावरील कर, व्यापारी आणि केमिस्ट यांना द्यावे लागणारे कमिशन, वाहतूक खर्च अशा विविध खर्चांचा बोजा अखेरीस रुग्णांवर पडतो. याउलट जेनेरिक औषधे यातील कित्येक खर्चांपासून मुक्त असल्यामुळे ती स्वस्त दरात उपलब्ध होतात. जेनेरिक औषधे शासकीय रुग्णालयांतून रुग्णांना दिली जातात. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आदेश काढून सर्व औषध विक्रेत्यांकडे ही औषधे विक्रीसाठी ठेवणे बंधनकारक केले पाहिजे. तसेच रुग्णांनीदेखील जेनेरिक औषधांचाच आग्रह धरला पाहिजे.- डॉ. राम हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सांगली. ‘फॅमिली डॉक्टर’नी रुग्णांना जेनेरिक औषध घेण्याचा आग्रह केला पाहिजे. या औषधांना केंद्र शासनाची मान्यता असल्यामुळे औषधे घेण्यात काहीही धोका नाही. बहुतांश औषध विक्रेत्यांकडे जेनेरिक औषधे उपलब्ध असतात. जेनेरिक औषधे घेण्याची लोकांची मानसिकता बनणे गरजेचे आहे.- मिलिंद भिलवडे, उपाध्यक्ष, केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, सांगली.दरामध्ये तफावत‘ब्रँडेड’ कंपन्यांचे तापावरील दहा गोळ्यांचे पाकीट बाजारात १५ रुपयांना उपलब्ध आहे, तर जेनेरिक औषधांचे पाकीट आठ रुपयांना उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ‘ब्रॅँडेड’ कंपनीच्या रक्तदाबाच्या १५ गोळ्यांचे पाकीट ५० रुपयांना मिळते, तर जेनेरिक औषधांचे पाकीट ३२ रुपयांना मिळते. ही केवळ वानगीदाखल उदाहरणे.
गैरसमजुतीमुळे जेनेरिक औषधांकडे पाठ
By admin | Updated: September 17, 2014 23:06 IST