चाचपणी सुरू : शिक्षणमंत्री गायकवाड यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यासंदर्भात उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासमोर प्रस्ताव ठेवला होता. परंतु, दहावीचे, बारावीचे विषय खूप असतात. तसेच वेगवेगळ्या भाषाही असतात. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेणे कठीण आहे. त्यामुळे आधी काही बाबी तपासून घ्याव्या लागतील, असे मंडळाने स्पष्ट केले. परिस्थितीनुसार दहावी, बारावीच्या परीक्षा कशा घ्यायच्या याची चाचपणी तज्ज्ञ व राज्य शिक्षण मंडळाकडून सुरू असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दिली.
राज्यातील ९ वी ते १२ वी चे वर्ग २५ जिल्ह्यांत सुरू झाल्याची माहिती शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिली. मात्र, यंदाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत विद्यार्थी, पालक प्रचंड संभ्रमात आहेत. दरम्यान, या संदर्भात नुकत्याच मुंबईतील जयवंत कुलकर्णी या शिक्षकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षा घेतल्याच तर ५० टक्के ऑनलाइन, ५० टक्के ऑफलाइन अशा पद्धतीने घ्याव्यात, असे मत राज्यातील २४ टक्के पालकांनी व्यक्त केले, तर २१ टक्के पालकांना प्रचलित पद्धतीने परीक्षा घेतल्या जाव्यात असे मत मांडले. १६ टक्के पालकांना संपूर्णपणे ऑनलाईन परीक्षा व्हाव्यात असे वाटते. शिक्षणमंत्री गायकवाड आणि राज्य शिक्षण मंडळातील अधिकारी वर्ग, तज्ज्ञ मंडळी यांनी दहावी, बारावीच्या परीक्षांचे नियोजन करताना पालक, शिक्षकांच्या या मतांचा विचार करुनच निर्णय घ्यावा असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
....................................