Join us  

सांगा, कोरोना रोखायचा कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 12:29 AM

केडीएमसीसमाेर गंभीर प्रश्न : नागरिकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन

कल्याण : दिवाळीपूर्वी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती, पण आता पुन्हा रुग्णसंख्येमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने आणि केडीएमसीने घालून दिलेल्या नियमांचे सर्रास होत असलेले उल्लंघन याला कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे काेराेनाला राेखायचे तरी कसे, असा प्रश्न सध्या पालिका प्रशासनाला भेडसावत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त हाेत असताना नगरिकांकडून नियमांना दिली जात असलेली तिलांजली कोरोनासंबंधी चिंता वाढवणारी आहे.

केडीएमसीच्या हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या अनलॉकमध्ये रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. जुलै महिन्यात सर्वाधिक म्हणजे १३ हजार ३९२ रुग्णांची नोंद झाली होती. १२ जुलैला एका दिवसात तब्बल ६६१ रुग्ण आढळले होते. गणेशोत्सव कालावधीत नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने सप्टेंबरमध्येही कोरोनाचा कहर कायम राहिला. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या राज्य सरकारच्या उपक्रमांतर्गत आणि वाढवलेल्या कोरोना चाचण्या यात केडीएमसीला कोरोनावर काही प्रमाणात का होईना, अंकुश आणण्यात यश आले. दिवाळीपूर्वी म्हणजे १० नोव्हेंबरला सर्वात कमी म्हणजे ५९ रुग्ण आढळून आले होते. पण, पुन्हा रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाल्याने दिवाळी खरेदीनिमित्त सर्वत्र झालेली गर्दी आणि नियमांचे नागरिकांकडून सर्रास होत असलेले उल्लंघन रुग्णवाढीला कारणीभूत ठरल्याची शंका व्यक्त होत आहे.

कारवाई अधिक तीव्र करण्याची मागणीअनलॉकमध्ये सर्वत्र बहुतांश व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेहऱ्यावर मास्क रूमाल, कापड परिधान करणे बंधनकारक आहे. पण, बऱ्याच ठिकाणी नागरिकांकडून या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई महापालिका करत असली, तरी या कारवाईचे भय राहिलेले नाही. तरुणांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सर्रास दिसत असले तरी भाजीविक्रेते, फेरीवाले, दुकानदारही त्यांना घालून दिलेल्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. एकूणच हे चित्र पाहता केडीएमसीने कारवाई अधिक तीव्र करायला हवी, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याठाणे