Join us  

अंधेरीतील जलवाहिनीच्या दुरुस्तीत तांत्रिक अडथळे; काम अद्याप सुरूच

By सीमा महांगडे | Published: December 03, 2023 5:46 PM

पूर्व आणि पश्चिम उपनगरात आणखी काही तास पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकणार नाही.

सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मेट्रो प्रकल्पाचे खोदकाम सुरु असताना अंधेरी पूर्व येथे सीप्झ गेट क्रमांक ३ आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळील मुख्य जलवाहिनी गुरुवारी फुटली. ती दुरुस्त करण्यास शनिवारी सुरुवात करण्यात आली. मात्र अद्याप काम पूर्ण झालेले नाही. रविवारी सायंकाळपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरात आणखी काही तास पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकणार नाही.वेरावली जलाशयाच्या १८०० मी. मी. व्यासाच्या दोन इनलेटपैकी एक इनलेट मुख्य जलवाहिनीला अंधेरी पूर्व येथे सीप्झ गेट क्रमांक ३ आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी धक्का लागला व गळती सुरु झाली. जलवाहिनीच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्यात आले होते. मात्र या जलवाहिनी दुरुस्तीचे मोठे काम शनिवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून हाती घेण्यात आले. हे काम रविवारी सकाळी पूर्ण होईल असे पालिकेतर्फे सांगण्यात आले होते. मात्र, या दुरुस्ती कामास तांत्रिक आव्हानामुळे अपेक्षेपेक्षा अधिक कालावधी लागला आहे.दुरुस्तीचे काम अविरत सुरु असून तांत्रिक आव्हानांमुळे त्यास अधिक कालावधी लागत आहे. रविवारी ३ डिसेंबर रोजी सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनीमध्ये पाण्याचा पुरेसा दाब तयार झाल्यावर पश्चिम उपनगरात वांद्रे ते अंधेरी, जोगेश्वरी आणि पूर्व उपगरात कुर्ला ते घाटकोपरपर्यंतच्या विभागात पाणीपुरवठा केला जाईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.कामाला का होतोय उशीर ?नादुरुस्त जलवाहिनी ही खूप खोल असून त्याला एकापेक्षा जास्त ठिकाणी हानी पोहोचली आहे. जलवाहिनीमधील पाण्याच्या दाबामुळे पूर्णपणे जलवाहिनी रिकामी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करावा लागत आहे. जलवाहिनीजवळ असणाऱ्या मातीमुळे काम करताना अडथळे निर्माण होत आहेत. या सर्व तांत्रिक आणि नैसर्गिक कारणांमुळे दुरुस्तीचे काम नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही.

टॅग्स :अंधेरी