Join us  

महाडमध्ये पोहोचले मुंबई महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 4:06 AM

मुंबई : अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये महापालिकेच्या वतीने मदतकार्यासाठी ११० अधिकारी - कर्मचारी यांचा समावेश असलेले पथक ...

मुंबई : अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये महापालिकेच्या वतीने मदतकार्यासाठी ११० अधिकारी - कर्मचारी यांचा समावेश असलेले पथक तसेच सहा जणांचा समावेश असलेले वैद्यकीय पथकही पाठविण्यात आले. आवश्यक यंत्रसामग्री आणि वाहने यांच्यासह पथक महाडमध्ये पोहोचले असून, पथकाने लागलीच मदतकार्यास सुरुवात केली.

पथकाचे नेतृत्व घनकचरा व्यवस्थापन खात्याचे कार्यकारी अभियंता गायकर आणि सहाय्यक अभियंता पाटणे करीत आहेत. या पथकामध्ये एकूण ११० अधिकारी आणि कर्मचारी तसेच अकरा वाहने समाविष्ट आहेत. १ पर्यवेक्षक, ५ कनिष्ठ अवेक्षक, ६ मुकादम, ७५ कामगार, २१ वाहनचालक आणि २ क्लिनर असे एकूण ११० कर्मचारी पथकात समाविष्ट आहेत, तर ४ बस, ३ डंपर, १ ब्रेक डाऊन वाहन, २ सुमो आणि १ ट्रक अशी ११ वाहने पथकासमवेत पाठविण्यात आली आहेत. हे पथक महाडमध्ये रविवारी दाखल झाले असून, तेथे लागलीच मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

सायन येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालयाच्या वतीने चार डॉक्टर आणि दोन तंत्रज्ञ यांचा समावेश असलेले वैद्यकीय पथकदेखील महाडमध्ये दाखल झाले आहे. हे पथक कोविड संसर्गसह हिवताप (मलेरिया), डेंगी, लेप्टो यांसारख्या पावसाळी आजारांसंदर्भातील वैद्यकीय तपासणीसाठी स्थानिक प्रशासनाला मदत करणार आहे.