Join us  

टॅक्सी आंदोलनाचा मुंबईकरांना फटका

By admin | Published: September 02, 2015 3:12 AM

ओला, उबेरसारख्या खासगी टॅक्सी कंपन्यांच्या सेवांना विरोध करीत स्वाभिमान टॅक्सी युनियनकडून मुंबईत आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाचा मुंबईकरांना फटका बसला

मुंबई : ओला, उबेरसारख्या खासगी टॅक्सी कंपन्यांच्या सेवांना विरोध करीत स्वाभिमान टॅक्सी युनियनकडून मुंबईत आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाचा मुंबईकरांना फटका बसला. काही ठिकाणी युनियनकडून जबदरस्ती करीत टॅक्सी बंद केल्या जात असल्याने भीतीपोटी चालकांनी टॅक्सी रस्त्यावर उतरवण्यास नकार दिला आणि दिवसभर टॅक्सी बंदच राहिल्या. स्वाभिमान युनियनकडून यासंदर्भात वांद्रे येथील परिवहन आयुक्त कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला. ओला, उबेर या खाजगी कंपनीच्या टॅक्सी कंपन्यांचा मनमानी कारभार मुंबईत सुरू असून, त्यावर शासनाचे नियंत्रण नसल्याचा आरोप सर्व टॅक्सी युनियनकडून केला जात आहे. अनधिकृतपणे टॅक्सीसेवा देताना काळ्या-पिवळ्या टॅक्सींप्रमाणेच भाडे आकारणी त्यांच्याकडून केली जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर बंदी आणावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे. ही मागणी करीत स्वाभिमान टॅक्सी युनियनकडून मंगळवारी मुंबईत आंदोलन करण्यात आले. वांद्रे, दादर, सायन, वरळी, एलफिन्स्टन, लोअर परेल, भायखळा, परेल, चर्चगेट, सीएसटीसह अन्य काही ठिकाणी टॅक्सी बंदच राहिल्या. त्यामुळे प्रवाशांनी स्टेशनपर्यंत पायीच जाण्याचा पर्याय निवडला. या आंदोलनामुळे बेस्टकडून जादा बसेस सोडण्यात आल्या. टॅक्सी धावतच नसल्याने त्याचे नेमके कारण मात्र मुंबईकरांना समजत नव्हते. दरम्यान, युनियनकडून परिवहन आयुक्तांना मागण्या सादर करण्यात आल्या. मात्र मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.स्वाभिमान टॅक्सी युनियन सोडल्यास अन्य टॅक्सी संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या नाहीत. रिक्षा चालकांकडून याला विरोध करण्यात आला असला तरी त्यांनीही आंदोलनात उडी घेतली नाही. मात्र कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी अन्य टॅक्सी युनियनच्या चालकांनी टॅक्सी बंदच ठेवणे पसंत केले. वांद्रे, दादर, सायन, वरळी, एलफिन्स्टन, लोअर परेल, भायखळा, परेल, चर्चगेट, सीएसटीसह अन्य काही ठिकाणी टॅक्सी बंदच राहिल्या. त्यामुळे प्रवाशांनी स्टेशनपर्यंत पायीच जाण्याचा पर्याय निवडला. या आंदोलनामुळे बेस्टकडून जादा बसेस सोडण्यात आल्या. त्यामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.