मुंबई : मुंबईत धावणाऱ्या ओला, उबेरसारख्या खासगी टॅक्सी सेवांना काळ्या-पिवळ्या टॅक्सी संघटनांचा विरोध कायम आहे. काहींनी सरकार दरबारी विरोध दर्शविला असून स्वाभिमान टॅक्सी संघटनेने तर येत्या १५ दिवसांत ओला, उबेर टॅक्सी सेवा रस्त्यातच रोखण्याचा इशारा दिला आहे. त्यांची ही भूमिका योग्य नसल्याचे सांगत शासनाच्या विरोधात काळ्या-पिवळ्या टॅक्सी संघटनांनी जाऊ नये, असे मत खासगी टॅक्सी कंपन्यांनी नोंदविले आहे. एकूणच मुंबईतील या ‘टॅक्सी वॉर’मुळे सर्वसामान्य माणूस मात्र भरडला जात आहे. नवी दिल्लीत उबेर चालकाने तरुणीवर बलात्कार केला आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. राज्यातही खासगी टॅक्सी मोठ्या प्रमाणात धावत असल्याने या सेवांवर बंदी आणावी किंवा महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाय करावेत, अशी मागणी जोर धरू लागली. यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने मुंबईतील खासगी टॅक्सी सेवांच्या बैठका घेऊन सुरक्षेसाठी उपाय करण्याच्या सूचना केल्या आणि त्यानुसार काही संघटनांनी उपाय केला. मात्र त्यावर तोडगा काढला जात असतानाच ओला, उबेरसारख्या टॅक्सी मुळातच अनधिकृत असून भाडे, सुरक्षा याचे नियोजन करण्यात येत नसल्याची माहिती काळ्या-पिवळ्या टॅक्सी संघटनांकडून देण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांची नोंदही सरकार दरबारी नसून त्यामुळे ओला, उबेरची आकडेवारीही उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. टूरिस्ट परमिट असतानाही स्थानिक पातळीवर या टॅक्सी चालवल्या जातात आणि मनमानी करत काळ्या-पिवळ्या टॅक्सीप्रमाणेच भाडे आकारणी केली जाते. त्यामुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांचे उत्पन्न बुडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ओला, उबेरवर बंदी आणावी, अशी मागणी जोर धरू लागली असून त्यावर रस्त्यावर उतरण्याची तसेच न्यायालयीन लढा लढण्याची तयारीही काळ्या-पिवळ्या टॅक्सी संघटनांनी केली आहे. चालकांचे उत्पन्न बुडत असून हे सरकारला दिसत कसे नाही, असा प्रश्न ‘मुंबई टॅक्सीमेन्स युनियन’चे महासचिव ए.एल. क्वाड्रोस यांनी केला. ‘सरकारकडून मसुदा तयार करण्यात आला असून त्यात खासगी टॅक्सीबाबतची भूमिका स्पष्ट होईल. जर काळ्या-पिवळ्या टॅक्सींना न्याय मिळाला नाही तर न्यायालयीन लढा देण्याची तयारी आम्ही ठेवली आहे,’ असेही क्वाड्रोस म्हणाले.स्वाभिमान टॅक्सी युनियनचे मुंबई अध्यक्ष के.के. तिवारी यांनीही ओला, उबेर टॅक्सीविरोधात आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘येत्या १५ दिवसांत आम्ही ओला, उबेर टॅक्सी ज्या-ज्या ठिकाणी धावताना दिसतील त्या-त्या ठिकाणी त्यांना रोखणार आहोत. याबाबत आम्ही लवकरच आमच्या सदस्यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ आणि ओला, उबेरचा मनमानी कारभार हाणून पाडू,’ असा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत ओला कंपनीच्या अधिकाऱ्यांशीही वारंवार संपर्क साधला असता त्यांनी मात्र यावर बोलण्यास नकार दिला. खासगी टॅक्सी 12,000 च्या घरातमुंबईत एसएमएस टॅक्सी कॅब्ज, लाइव्ह माइंड सोल्युशन, मेरू कॅब, कारझॉनरेंट इंडिया प्रा.लि., प्रियदर्शनी टॅक्सी, टॅक्सी फॉर शुअर, उबेर कॅब, ओला, कॅब्जो, टॅब कॅब, मेरू फॅक्ल्सी कॅब आहेत. त्यांची एकूण संख्या ही १२ हजारपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. न्यायाची अपेक्षा!आम्ही योग्य आणि चांगली सेवा देणाऱ्या कंपन्या आहोत. सध्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी संघटनांकडून जो विरोध केला जात आहे तो चुकीचा आहे आणि सरकारही का सहन करत आहे हे कळत नाही. आम्ही योग्य भाडे आकारत आहोत आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठीही उपाययोजना केल्या आहेत. हेच काळ्या-पिवळ्या टॅक्सींकडे आहे का, हा प्रश्न आहे. आम्हाला शासनाकडून योग्य तो न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. आमची देशातील २२ शहरांत टॅक्सी सेवा सुरू आहे. दीड लाख चालक आहेत. टॅक्सींची संख्या काळ्या-पिवळ्या टॅक्सींपेक्षा कमीच आहे. - शैलेश सावलानी (उबेर, महाव्यवस्थापक)यावर सरकारकडून योग्य तोडगा काढण्यात यावा. टॅक्सी कंपन्या आणि संघटनांच्या वादात सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.- अक्षय कदम (दादर) रिक्षा आंदोलन असो किंवा टॅक्सी आंदोलन, यामध्ये प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे याचा विचार टॅक्सी युनियनबरोबरच सरकारनेही करावा. सततच्या आंदोलनामुळे आपल्याला काय मिळते हे टॅक्सी युनियनने तपासून घ्यावे. - मिलिंद सकपाळ (वांद्रे)
शहरात ‘टॅक्सी वॉर’
By admin | Updated: September 8, 2015 05:18 IST