मुंबई : कर्जत येथील तासगावकर महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी बुधवारी आझाद मैदानात आंदोलन केले. तसेच विद्यापीठाने नेमलेली समिती महाविद्यालयात दाखल झाली. मात्र, प्रशासनाने समितीला काही कागदपत्रे देण्यास नकार दिला आहे. गुरुवारी दुपारपर्यंत समितीला माहिती द्यावी, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा विद्यापीठाने महाविद्यालयाला दिला आहे.महाविद्यालय बंद असल्याने महाविद्यालयातील विद्यार्थी सकाळी ११ वाजल्यापासूनच विद्यापीठाच्या प्रांगणात जमा झाले होते. मात्र, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी त्यांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची विनंती केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात महाविद्यालयाच्या विरोधात घोषणाबाजी केली.विद्यापीठाने महाविद्यालयाच्या चौकशीसाठी नेमलेली समिती बुधवारी महाविद्यालयात दाखल झाली. यावेळी समितीला प्रशासनाने काही कागदपत्रे दाखविली. मात्र, समितीला आवश्यक असलेली कागदपत्रे देण्यास प्रशासनाने नकार दिल्याने बुधवारी समितीला कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. समितीला गुरुवारी दुपारपर्यंत माहिती द्यावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा विद्यापीठाने महाविद्यालय प्रशासनाला दिला आहे. (प्रतिनिधी)
‘तासगावकर’च्या विद्यार्थ्यांचा मुंबईत मोर्चा
By admin | Updated: February 5, 2015 01:39 IST