मुंबई २०३० पर्यंत पूरमुक्त करण्याचे लक्ष्य; नाल्यावर बसविणार गेट पंप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 03:11 AM2020-02-07T03:11:31+5:302020-02-07T06:20:46+5:30

मुंबई शहर २०३० पर्यंत पूर आणि आपत्तीमुक्त करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केला आहे

Target of flood free Mumbai till 2030 | मुंबई २०३० पर्यंत पूरमुक्त करण्याचे लक्ष्य; नाल्यावर बसविणार गेट पंप

मुंबई २०३० पर्यंत पूरमुक्त करण्याचे लक्ष्य; नाल्यावर बसविणार गेट पंप

Next

मुंबई : मुंबई शहर २०३० पर्यंत पूर आणि आपत्तीमुक्त करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केला आहे. प्रत्येक पावसाळ्यात पाणी तुंबण्याची आणखी नवीन ठिकाणे आढळून येत आहेत. त्यामुळे महापालिकेने पाणी तुंबणाऱ्या प्रत्येक ठिकाणचे सूक्ष्म नियोजन केल्यानंतर एकूण २७३ ठिकाणे शोधून काढण्यात आली. यापैकी २०४ परिसर पूरमुक्त करण्यात आले आहेत. तसेच आणखी ४५ स्थळे येत्या पावसाळ्यापूर्वी पूरमुक्त होतील, असा दावा पालिकेने केला आहे.

२६ जुलै २००५ मध्ये मुंबईला पुराचा तडाखा बसल्यानंतर ब्रिमस्टोवॅड प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यानुसार पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता ताशी ५० मि.मी. वाढविणे, आठ पम्पिंग स्टेशन उभारणे, नाल्यांचे रुंदीकरण आदी कामे हाती घेण्यात आली. मात्र १४ वर्षांनंतरही मोगरा आणि माहुल पम्पिंग स्टेशन कागदावरच आहे. तर मुंबईत काँक्रिटच्या जंगलामुळे पाणी तुंबण्याची ठिकाणे वाढली आहेत. त्यामुळे मुंबई पूरमुक्त करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट असफल झाले होते.

मात्र मुंबई शहर जागतिक दर्जाचे करण्यासाठी पूरमुक्त व आपत्तीमुक्त होणे आवश्यक आहे. यासाठी गेल्या दोन वर्षांत पाणी तुंबणाºया सर्व ठिकाणांचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले. त्यानुसार २०१७ आणि २०१८ या काळात २७३ ठिकाणी पाणी तुंबत असल्याचे उजेडात आले. या दोन वर्षांच्या काळात २०४ ठिकाणे पूरमुक्त करण्यात आली, तर ४५ ठिकाणी काम सुरू आहे. पाणी तुंबणारी उर्वरित २४ ठिकाणे पूरमुक्त करण्यासाठी पालिका नियोजन करणार आहे.

पूरमुक्त मुंबईसाठी...

भरतीचा प्रभाव कमी करणे आणि सखल भागात साचणारे पाणी कमी करण्यासाठी नदी, नाले, खाडी, समुद्राच्या पातमुख्यांवर गेट पंप बसविण्यात येणार आहेत. शिवाय नाल्यांमध्येच गेटपंप बसविण्याबाबत प्लॅनिंग सुरू असून, यामुळे तिवर तोडण्याची आणि पम्पिंग स्टेशनसाठी जागेचीही गरज भासणार नाही.

समुद्रात जाणारा कचरा रोखण्यासाठी विले पार्लेजवळील ईर्ला, वरळीजवळील लव्हग्रोव्हसारख्या मोठ्या नाल्यांवर ‘बॅक रेक स्क्रीन्स’ बसविण्यात येणार आहेत. तर पाण्याच्या निचऱ्यासाठी फ्लड गेट बसविणार. रेल्वे मार्गावरील मोठ्या मोऱ्यांमधील गाळ काढण्याचे काम सक्षमतेने करण्यासाठी ‘हायड्रोझूम कॅमेरा’, रेल्वे-रस्ते मार्गावरील मोठ्या मोऱ्यांमधील गाळ कार्यक्षमतेने काढण्यासाठी ‘रिमोट कंट्रोल्ड स्विंगलोडर’ मशीनची खरेदी करण्यासाठी २.६८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

२०२० च्या पावसाळ्यासाठी मोठे नाले, छोटे नाले आणि मिठी नदीमधून गाळ काढण्यासाठी अनुक्रमे ५० कोटी, ७० कोटी आणि १८ कोटींची तरतूद केली आहे. मुंबईत भरती आणि ओहोटीच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास खोलगट भागात पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे पर्जन्य जलवाहिन्यांवर भरती-ओहोटीचा परिणाम होऊ नये यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मोगरा आणि माहुल येथे दोन पम्पिंग स्टेशन उभारण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. या दोन्ही पम्पिंग स्टेशनसाठी जमीन संपादन केल्यानंतर त्यांचे काम सुरू करण्यात येईल. पम्पिंग स्टेशनसाठी दीडशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: Target of flood free Mumbai till 2030

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.