Join us  

तरेंचा अर्ज :गलांडे यांच्यावर कारवाई ?

By admin | Published: October 21, 2014 1:56 AM

अर्ज एबी फॉर्मची मूळ प्रत सोबत जोडली नाही म्हणून व अन्य काही आक्षेप घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी जीवन गलांडे यांनी तो अर्ज फेटाळून लावला होता.

ठाणे : कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार म्हणून अनंत तरे यांनी दाखल केलेला अर्ज का फेटाळला याचा आणि याबाबत तरे यांनी आपल्या तक्रारीत उपस्थित केलेले निवडणूक अधिकाऱ्यांच्या पक्षपातीपणाचे आक्षेप याबाबत तातडीने खुलासा करावा, असा आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन गलांडे यांना दिला आहे. तो समाधानकारक नसल्यास गलांडेवर कारवाई होण्याची शक्यता आहे.अनंत तरे यांनी शिवसेनेने ठाणे शहर मतदारसंघात त्यांच्याऐवजी रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ संतप्त होऊन भाजपाचे उमेदवार म्हणून कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. छाननीच्या वेळी तो अर्ज एबी फॉर्मची मूळ प्रत सोबत जोडली नाही म्हणून व अन्य काही आक्षेप घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी जीवन गलांडे यांनी तो अर्ज फेटाळून लावला होता. मी अर्ज भरायला गेलो तेव्हापासून ते अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत गलांडे यांचे माझ्याशी असलेले वर्तन अत्यंत पक्षपाती आणि पूर्वग्रहदूषित असे होते, असा आरोप करून त्यांच्यावर चौकशीअंती कठोर कारवाई करणारा अर्ज शिवसेनेचे उपनेते व माजी महापौर व आमदार अनंत तरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केला होता. आपल्या तक्रार अर्जात तरे यांनी म्हटले होते की, मी २ वाजून ४० मिनिटांनी अर्ज भरण्यास गेलो असता गलांडे सतत कुणाशी तरी फोन आणि मोबाइलवर बोलत होते. हे बोलणे माझ्या अर्जाशी संबंधित होते, असा मला संशय आहे. याबाबत, या काळात गलांडे यांना मोबाइल आणि लॅण्डलाइनवर आलेल्या व तेथून केल्या गेलेल्या फोनचे रेकॉर्ड मागवून चौकशी व्हावी. मी सगळ्यात शेवटी आलो होतो. माझ्या आधी काही उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. त्यामुळे रांगेतील क्रमांकानुसार अर्ज घेण्याऐवजी गलांडे हे सारखे मला तुमचा अर्ज आधी द्या, असा आग्रह करीत होते. माझ्या आधीची मंडळी रांगेत उभी आहेत, त्यांचे अर्ज क्रमांकानुसार घ्या, अशी मी त्यांना न्याय्य विनंती केली. तरी ते ऐकायला तयार नव्हते. दुपारी २.५९ वाजता माझा अर्ज त्यांनी त्याची कोणतीही तपासणी न करता जसाच्या तसा घेतला आणि रिसिव्हडची पावती दिली. अर्ज घेताना त्यांच्याकडून शपथपत्र घेण्याचे राहिले. ते लक्षात आणून देऊन त्यांना दिले असता ते घेण्यास त्यांनी नकार दिला. ते अर्जासोबत दिले नाही म्हणून मी आता घेणार नाही, असे ते म्हणाले. नंतर, त्यांनी मला कोऱ्या कागदावर सही करण्यास सांगितले. त्याला मी नकार दिला. तुम्ही माझा अर्ज रिजेक्ट व्हावा, असा प्रयत्न करीत आहात, असे खडसावल्यावर त्यांनी माझे शपथपत्र स्वीकारले. माझ्या आधीच्या सर्व उमेदवारांना सोबत छायाचित्रकार नेण्याची अनुमती दिली गेली. मला ती नाकारली गेली. माझ्याकडे पक्षाचे एबी फॉर्म मूळ प्रतीत होते. परंतु, मी त्याच्या झेरॉक्स प्रती लावल्या. अर्जासोबत मूळ प्रत जोडावी लागते, हे कळल्यावर मी त्या देण्याचा प्रयत्न केला असता त्या त्यांनी नाकारल्या असे तरे यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले होते. गलांडेचा खुलासा निवडणूक आयोगाकडे पाठविला जाण्याची शक्यता आहे.