Join us  

छोटा काश्मिरात आढळला सर्वांत उंच निवडुंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 2:37 AM

उंची ४० फुटांपेक्षा अधिक ; जतनासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले

मुंबई : गोरेगाव येथील आरे कॉलनीतील छोटा काश्मीर येथे सर्वांत मोठे निवडुंग असून सध्या ते पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. ‘मून लाइट’ असे या निवडुंगाचे नाव असून, त्याची उंची जवळपास ४० फुटांहून अधिक आहे. अ‍ॅरिझोना वाळंवटातील हे निवडुंग आहे. सध्या हा निवडुंग फुलांनी बहरला आहे. या निवडुंगाचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे असून यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले आहेत.

मिशन ग्रीन मुंबईचे संस्थापक शुभजीत मुखर्जी यांनी सांगितले की, मून लाइट निवडुंगाच्या एका झाडाला शंभरहून अधिक फुले येतात. एक फुल हे १०-१२ इंचादरम्यान वाढते. फुले ही पाच ते सहा वर्षांतून एकदाच उगवतात.

फुलांचा रंग सफेद असून त्याचा सुगंध परिसरात दरवळत असतो. ही फुले अंधार झाल्यावर फुलतात. निवडुंगांचे खरे वास्तव्य वाळवंटात असल्यामुळे ऊन पडल्यावर याची फुले मावळायला लागतात. छोटा काश्मीरमध्ये सध्या असलेल्या निवडुंगांची उंची ही ४० फुटांपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे ‘मून लाइट’ हे ४० फुटांपेक्षा अधिक उंची असलेले येथील सर्वांत उंच निवडुंग ठरलेआहे.

छोटा काश्मीरमध्ये असलेल्या १५ निवडुंगांपैकी तीन निवडुंगे फुलांनी बहरली आहेत. येथील निवडुंग ८० वर्षांपासून आहेत. निवडुंगांवर फुले पाहिल्यावर ती तोडण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही. मात्र, यामुळे निवडुंगांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मून लाइट निवडुंग हे मुंबईमध्ये इतर कोठेही नाही, त्यामुळे येथील निवडुंगाचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे.

टॅग्स :मुंबईआरे