Join us  

मुंबई विद्यापीठावर फौजदारी व शिस्तभंगाची कारवाई करा, विद्यार्थ्यांची उच्च न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 5:31 AM

मुंबई विद्यापीठाचा निकाल जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबामुळे, लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. गुणपत्रिका नसल्याने पुढील प्रवेश निश्चित करणे अशक्य झाले आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा निकाल जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबामुळे, लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. गुणपत्रिका नसल्याने पुढील प्रवेश निश्चित करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळणाºयांवर फौजदारी व शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच या भोंगळ कारभाराच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमावा, अशी विनंती याचिका मुंबई विद्यापीठातील विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतल्याने, निकाल जाहीर करण्यास सुमारे अडीच महिन्यांचा विलंब झाला. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरचा व नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुणपत्रिका नसल्याने देशातील व देशाबाहेरील विद्यापीठांनी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे लॉच्या तीन विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याशिवाय लॉचा निकाल तीन दिवसांत लावावा व करिअरशी खेळ केल्याने, प्रत्येकी १० लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांना मुंबई विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेसमध्ये प्रवेश देण्यासंदर्भात आदेश देण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा, अशीही मागणी सचिन पवार, अभिषेक भट व रविशंकर पांडे यांनी याचिकेद्वारे केली आहे.