Join us  

चौकशी करून दोषींवर कारवाई करा -  रवींद्र वायकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 1:51 AM

जोगेश्वरी पूर्व येथील बालविकास विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या माध्यमातून झालेल्या विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशी करून, दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी पोलिसांना केली.

मुंबई : जोगेश्वरी पूर्व येथील बालविकास विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या माध्यमातून झालेल्या विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशी करून, दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी पोलिसांना केली. शनिवार सकाळी रवींद्र वायकर यांनी बालविकास विद्यामंदिर शाळेला भेट दिली. या वेळी आयोजित बैठकीत त्यांनी उपस्थित शाळा व्यवस्थापनाचे पदाधिकारी, पोलीस, महापालिकेच्या शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्याशी संवाद साधला, या वेळी ते बोलत होते.महानगरपालिकेच्या नियमानुसार बचतगटाचे किचन होते का? याचीही तपासणी करण्याच्या सूचना रवींद्र वायकर यांनी उपस्थित महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकारी वर्गाला दिल्या आहेत. १३ डिसेंबर रोजी जोगेश्वरी पूर्व, शामनगर येथील बालविकास विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत देण्यात आलेली खिचडी खाल्ल्याने सुमारे ३८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. या घटनेनंतर या सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने कोकण, तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेनंतर दोन मुलांच्या पोटांतील अन्नाचे नमुने, तसेच सातही डब्यातील खिचडीचे नमुने शासनाच्या कालिना येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचबरोबर, अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागानेही नमुने आपल्या प्रयोगशाळेत नेले आहेत. गोडाउनमधील धान्याचे नमुनेही घेण्यात आल्याची माहिती, मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांडुरंग पाटील यांनी राज्यमंत्र्यांना दिली.या सर्व नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले, तर या खिचडीचे नमुने महापालिकेच्या प्रयोगशाळेतही तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती, उपशिक्षणाधिकाºयांनी दिली. या घटनेनंतर या शाळेतील विद्यार्थ्यांना ‘शालेय पोषण आहार’ नको, अशी भूमिका पालकांनी घेतल्याची माहिती, शाळा व्यवस्थापनाने वायकर यांना दिली.किचन नियमानुसार होते का?ज्या बचत गटाकडून ही खिचडी आणण्यात आली होती, त्यांचे किचन महापालिकेच्या नियमानुसार होत का? याची तपासणी करण्यात यावी, अशी सूचना वायकर यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकारी वर्गाला केली. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांना जे अन्न देण्यात आले, त्यात आवश्यक तेवढ्या कॅलरीज होत्या का? याचीही तपासणी करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी पोलीस विभागाला केली.

टॅग्स :मुंबई