Join us  

शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार संचमान्यता करण्यात येणार आहे, असे निर्देश शालेय शिक्षण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार संचमान्यता करण्यात येणार आहे, असे निर्देश शालेय शिक्षण विभागामार्फत जारी करण्यात आले आहेत. आधार नोंदणीचे काम अपूर्ण राहिले तर कमी दिसणाऱ्या पटसंख्येमुळे शिक्षकांची पदे संचमान्यतेत कमी होतील, असे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयाविरोधात शिक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे, तसेच शिक्षक व मुख्याध्यापक वर्गातून प्रचंड विरोध होत आहे.

आधार नसलेली मुले पटावर येणार नसतील तर त्यांना शिकविण्यासाठी शिक्षक पदेही कमी होतील. यात शिक्षकांचे तर नुकसान होईल त्याचबरोबर विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होणार असल्याची प्रतिक्रिया मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव पांडुरंग केंगार यांनी दिली.

कोरोनामुळे आधारकार्ड मिळण्यास विद्यार्थ्यांच्या पालकांना खूप अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत आधार नोंदणी असलेल्या विद्यार्थीसंख्येच्या आधारवर संचमान्यता झाल्यास राज्यातील हजारॊ शिक्षक अतिरिक्त होऊ शकतात. त्यामुळे शिक्षण विभागाने हा निर्णय मागे घ्यावा, तसेच आधार नोंदणीसाठी शाळा, मुख्याध्यापकांना पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनेकडून होत आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क नाकारण्याचा प्रकार

गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ राज्यातील शाळा व शैक्षणिक संस्था बंद आहेत. सध्या जरी ऑनलाइन माध्यमातून शिक्षण प्रक्रिया चालू आहे. अनेक पालकांचा व्यवसाय, नोकरी गेल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीचे काम अपूर्ण राहिले आहे. अनेक विद्यार्थी स्थलांतरित झाले आहेत. त्यांचे आधारकार्ड नाही म्हणून त्यांना शाळांमध्ये दाखल करायचे नाही का ? हा निर्णय म्हणजे त्यांचा शिक्षण हक्क नाकारण्यासारखे नाही का ? असा सवाल मुख्याध्यापक करीत आहेत.