Join us  

स्वाइनमुळे मुंबईत दोन मृत्यू, नवे ४३ रुग्ण

By admin | Published: March 15, 2015 1:05 AM

मुंबईतील तापमानात होणारी वाढ आणि मधूनच पडणारा पाऊस या असमतोल वातावरणामुळे स्वाइन फ्लूची साथ वाढत आहे. १३ मार्च रोजी मीरा रोड आणि रायगड येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : मुंबईतील तापमानात होणारी वाढ आणि मधूनच पडणारा पाऊस या असमतोल वातावरणामुळे स्वाइन फ्लूची साथ वाढत आहे. १३ मार्च रोजी मीरा रोड आणि रायगड येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्ल्यूमुळे मुंबईत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांची संख्या २१ वर गेली आहे. १४ मार्च रोजी मुंबईत स्वाइनचे नवे ४३ रुग्ण आढळले असून २५ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई बाहेरून ९ नवे रुग्ण उपचरासाठी दाखल झाले आहेत. मीरा रोड येथील ३५ वर्षीय पुरूषास ११ मार्च रोजी भक्तीवेदांत रुग्णालयात दाखल केले होते. त्याच दिवशी त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. रायगड येथील ४२ वर्षीय महिलेला जीवदानी रुग्णालयात दाखल केल्यानंतर महापालिकेच्या रुग्णालायत दाखल करण्यात आले होते. यानंतर ११ मार्चला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. १३ मार्चला या महिलेचा मृत्यू झाला. मुंबईत आढळलेल्या ४३ नवीन रुग्णांपैकी २२ पुरूष तर २१ महिला आहेत. १८ जणांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू असून २५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई बाहेरून ९ नवे रुग्ण आढळले असून ६ पुरूष ३ महिलांचा समावेश आहे. राज्यात स्वाइन फ्लूने १३ जण दगावलेपुणे : शुक्रवारी या आजाराने आणखी १३ जणांचा बळी घेतला. यामुळे या वर्षातील बळींची संख्या २७७ वर पोहोचली आहे. ३१ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दिवसभरात राज्यातील सुमारे १५ हजार संशयित रुग्णांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार संशयितांना टॅमीफ्लू औषधे देण्यात आली. स्वाइन फ्लूची लागण झालेले १६९ नवे रुग्ण सापडले असून अशा रुग्णांची संख्या ३ हजार ३०४ वर पोहोचली आहे. लागण झालेले ४१४ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.