Join us  

मिठी नदीची नालेसफाई कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 2:30 AM

महापालिका आयुक्तांना निवेदन : तत्काळ कार्यवाहीची मागणी

मुंबई :  मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने सुरू असल्याने मागील वर्षीप्रमाणे महापालिकेच्या पावसाळापुर्व कामांवर त्याचा परिणाम यावर्षीही होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सध्या ही कामे संथ गतीने सुरू असल्याने अंधेरी भागासह मुंबईत अनेक ठिकाणी पावसाळ्यात पूरस्थिती  निर्माण होण्याची भीती व्यक्त करीत या कामांबाबत तातडीने लक्ष घालण्याची मागणी मनसेचे अंधेरी (पुर्व)चे विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी महापालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे अशा तिन्ही भागातून मिठी नदीचा प्रवाह आहे. पावसाळ्यात मिठी नदीच्या पत्राने धोक्याची पातळी ओलांडल्यास मुंबई पाणी भरते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या नदीमधील ७० टक्के गाळ काढणे आवश्यक आहे. नियमानुसार ३१ मे पर्यंत ही कामे पूर्ण करणे अपेक्षित आहे. मिठी नदीमधून सुमारे एक लाख ३८ हजार ८३० मॅट्रिक टन गाळ उपसण्याचे लक्ष्य असते. यापैकी ७० टक्के म्हणजे ९८ हजार ५०० मॅट्रिक टन गाळ पावसाळ्यापूर्वी काढला जातो. तसेच मुंबईतील एकूण २६३.९१ किमी लांबीच्या २८० नाल्यांमधून पावसाळ्याआधी २,५३,३४४ मॅट्रिक टन गाळ काढणे आवश्यक आहे. परंतु हे काम जवळपास कागदावरच असल्याचे रोहन सावंत यांनी या निवेदनात म्हटले आहे.मरोळ वॉर्ड ७५ येथील रमाबाई नगर-पंचशील नगर, मरोळ,मरोळ गांव मार्केट-चर्च रोड (सैंट जॉन चर्च मरोळ जवळ) मार्गे कृष्णा नगर, मरोळ, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी, पूर्व,वॉर्ड ७६ येथील कोंडीविता ते वाय.सी चाळ, दीनदयाळ उपाध्यानगर, वॉर्ड ८१ एलआयसी मार्केट, मालपा डोंगरी नंबर.२, वॉर्ड क्र.८० पारसी वसाहत, गुंदविली मनपा शाळा,वॉर्ड क्र.८४ मालधारी रहिवाशी संघ, साई वाडी येथील नालेसफाईकडे पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. आधी निवडणुकांच्या कामांचे कारण देत नालेसफाईकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले होते. गतवर्षी थेट फायदा ठेकेदारांनी घेतला असून अद्याप नाले आणि मिठी नदीच्या सफाई कामांना वेगच आलेला नाही.आपण स्वतः या प्रकरणात जातीने लक्ष घालून मिठी नदी व नाल्यांची पाहणी करून आढावा घ्यावा. मिठी नदी व नालेसफाई करण्यात दिरंगाई किंवा हलगर्जीपणा करणाऱे अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांची चौकशी करून कठोर कारवाही करवी. अन्यथा नाल्यातील कचरा तसेच गाळ स्वखर्चाने  काढून के/पूर्व तसेच पर्जन्य जल वाहिन्या, पश्चिम उपनगरे यांच्या  कार्यालयाच्या आवारात टाकून महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.मिठी नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित अंधेरी, पूर्व विधानसभा क्षेत्रातील मिठी नदी व नाल्याची मी स्वतः पाहणी केली असता मिठी नदी व नालेसफाईचे पितळ उघडे पडले. सफाई केलेले नाले, मिठी नदी पुन्हा केरकचरा व गाळाने भरतात कसे, हा संशोधनाचा विषय आहे. विशेषतः समाज कंटकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून इमारतींचे मलमूत्र, घरगुती सांडपाणी, धातू व रसायन मिश्रीत सांडपाणी, बांधकाम सामान आणि घनकचरा यामुळे मिठीला ‘ओपन ड्रेन’ बनवले आहे. परिणामी मिठी नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली असून मुंबई शहराला महापूराचा धोका निर्माण झाला आहे. बिल्डरांनी नाले पाइपबंद केल्याची, स्लॅब टाकून बंद केल्याची यादी मोठी आहे, अशी तक्रार महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.