Join us  

पहिलीतील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, स्वरांग आजारी नव्हता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 5:58 AM

शाळेत खेळताना अचानक बेशुद्ध पडून पहिलीच्या वर्गात शिकणा-या एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना पवार पब्लिक स्कूलमध्ये गुरुवारी सकाळी घडली. साकीनाका पोलीस विद्यार्थ्याच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहेत.

मुंबई : शाळेत खेळताना अचानक बेशुद्ध पडून पहिलीच्या वर्गात शिकणा-या एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना पवार पब्लिक स्कूलमध्ये गुरुवारी सकाळी घडली. साकीनाका पोलीस विद्यार्थ्याच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहेत.स्वरांग रत्नदीप दळवी (६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका मधुरा फडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, मधल्या सुट्टीत तो वर्गाबाहेर गेला व १०च्या सुमारास बेशुद्ध पडला. त्याला शाळेतील प्रथमोपचार विभागात नेले. त्यानंतर हिरानंदानी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या ठिकाणी स्थानिक आ. आरिफ नसीम खान यांनी भेट दिली. स्वरांग मित्रांसह धावता धावता थांबला. भिंतीला पकडून उभा राहिला व खाली कोसळल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे, असे खान यांनी ‘लोकमत’ला सांगितले. स्वरांगचे वडील रत्नदीप हे पवार पब्लिक शाळेच्या भांडुप शाखेत कला प्रशिक्षक आहेत. स्वरांग त्यांचा एकुलता एक मुलगा होता.धावत बिस्कीट खाणे बेतले जिवावर?बिस्कीट खाल्ल्यावर स्वरांगने मित्रांसोबत धावत होता. काही खाल्ल्यानंतर शरीराची लगेच झालेली हालचाल अन्ननलिकेतील ब्लॉकेजला कारणीभूत ठरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याच्या पोटातील काही अंश व विसेरा कलिना प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असून या अहवालाअंती त्याच्या मृत्यूचे कारण कळेल.दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये सध्या तरी काही संशयास्पद आढळले नाही. सहा जणांचे जबाब नोंदवले असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.>स्वरांग आजारी होता, त्याला मध्येच चक्कर यायची अशी चर्चा शाळेत होती. परंतु तो आजारी नव्हता. त्याला हलका खोकला होता. मात्र कोणताही मोठा आजार नव्हता ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे त्याचे काका नीलेश दळवी यांनी सांगितले.