Join us  

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या आतापर्यंतच्या नोंदणीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 2:00 AM

प्रवेश नियामक प्राधिकरणाचा निर्णय; विद्यार्थी आणि पालकांकडून संताप व्यक्त

मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या अर्जात तांत्रिक कारणांमुळे बऱ्याच त्रुटी राहिल्या आहेत. अशा सदोष माहितीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे धोकादायक असल्याचे मत व्यक्त करीत प्रवेश नियामक प्राधिकरणाने आतापर्यंतच्या प्रवेश नोंदणी प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता नव्याने अर्ज दाखल करावे लागणार आहेत.प्रवेश प्रक्रियेदरम्यान सर्व्हर डाऊन असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या होत्या. त्यांची दखल घेत सीईटी सेलच्या आयुक्तांनी सर्व्हर सांभाळणाºया एजन्सीसमवेत गुरुवारी बैठक घेतली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.विद्यार्थ्यांनी नोंदणी करताना भरलेली माहिती एकत्रिपणे संलग्नित करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, असे उमेदवारांनी भरलेल्या अर्जाच्या प्रती मुद्रित केल्यावर लक्षात आल्याच्या तक्रारी सीईटी सेलला प्राप्त झाल्या. अशा सदोष माहितीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे धोकादायक असल्याचे मत प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने व्यक्त केले. त्यानुसार आॅनलाइन अर्ज भरण्याची, भरलेल्या अर्जाची व अपलोड केलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची प्रक्रिया स्थगित करून नवीन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय प्रवेश नियामक प्राधिकरणाने घेतला आहे.दरम्यान, आधीच सर्व्हर डाऊन, लिंक ओपन न होणे, अर्ज भरताना अडचणी येणे यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले होते. आता नोंदणी प्रक्रियेला स्थगिती मिळाल्यामुळे सीईटी सेलने अर्जनिश्चिती झालेल्या २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा छळ केल्याची संतप्त प्रतिक्रिया पालक-विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.अडीच लाख विद्यार्थ्यांचे नुकसानसीईटीला बसलेल्या ४ लाख विद्यार्थ्यांपैकी अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कृषी वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर अशा विविध अभ्यासक्रमांसाठी तासन्तास सेतू केंद्रावर बसून नोंदणी केली होती. मात्र आता वेळ आणि पैसा फुकट गेल्याने पालक आणि विद्यार्थी संताप व्यक्त करीत आहेत.विविध संचलनालये आणि सीईटी सेल यांच्यातील असमन्वयाचा फटका विद्यार्थ्यांना बसला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, विद्यार्थी आणि पालकांची अशी हेळसांड करण्याआधी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आपल्यातील समन्वय सुधारण्याची आवश्यकता असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.सोमवारपासून भरा नवे अर्जनव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार २४ जूनपासून सुरू होणार असून, त्यासंबंधी सुधारित वेळापत्रक सीईटी सेलकडून जाहीर केले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरला आहे, अशा सर्वांना पुन्हा नव्याने अर्ज सादर करावा लागणार आहे. नव्या अर्ज प्रक्रियेत यापूर्वी अर्ज सादरकेलेल्या व अर्जासोबत शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचे हितरक्षण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले.