Join us  

बीकेसीत झुलता पूल, थरारक अनुभव घेता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 2:36 AM

मुंबईतील आर्थिक केंद्र म्हणून नावारूपाला आलेल्या बीकेसी येथे आता पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी झुलता पूल उभारला जाणार आहे.

मुंबई : मुंबईतील आर्थिक केंद्र म्हणून नावारूपाला आलेल्या बीकेसी येथे आता पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी झुलता पूल उभारला जाणार आहे. बीकेसीतल्या ई ब्लॉक ते महाराष्ट्र नगरपर्यंतच्या या ५५० मीटर लांबीच्या पुलासाठी सुमारे ५१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.मुंबईच्या आर्थिक केंद्रात मनोरंजनाच्या किंवा पर्यटनाच्या कोणत्याही सेवासुविधा एमएमआरडीएने निर्माण केल्या नाहीत, अशी टीका होत असते. त्यामुळे लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आयसारखे पर्यटकांना आकर्षित करण्याचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्राधिकरणाने हाती घेतले आहेत. त्यात आता या झुलत्या पुलाचीसुद्धा भर पडणार आहे.हा ५५० मीटर लांबीचा पूल उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता घेऊन प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमला जाईल. या कामासाठी साधारणत: ५१ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून येत्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केली जाईल.पुलाच्या कामाचे सविस्तर अभियांत्रिकी संरेखन (डिटेल इंजिनीअरिंग डिझाईन) तयार झाल्यानंतर खर्चाचे आकडे थोड्याफार प्रमाणात कमी-जास्त होऊ शकतील, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.क्लब हाउस आणि हेलिपॅडजी ब्लॉकमधील मनोरंजनाच्या प्रयोजनासाठी राखीव असलेला भूखंड आणि टेकडी हिल्स अशी सुमारे ६.८७ हेक्टर जागा उपलब्ध आहे. त्याचा विकास डिझाइन, फायनान्स, बिल्ड, आॅपरेट अ‍ॅण्ड ट्रान्सफर (डीएफबीओटी) तत्त्वावर करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. तिथे क्लब हाउस, दोन हेलिपॅड, लग्नसमारंभांसाठी लॉन, भूमिगत वाहनतळ आदी सुविधा निर्माण केल्या जातील. त्यातून एमएमआरडीएला वार्षिक१० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होईल, असा अंदाज आहे. जो निविदाकार जास्तीतजास्त महसूल देईल त्यांच्याकडे हे काम सोपविले जाईल.

टॅग्स :मुंबई