पाेलीस चाैकशी सुरू : दोन मुलींची हत्या करून पित्याची आत्महत्या प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दोन मुलींची हत्या करून अजगर अली जब्बार अली उर्फ बबली (४५) याने गळफास घेत आत्महत्या केली. गळा दाबून मुलींचा जीव घेण्यात आल्याचा संशय असून या प्रकरणी कांदिवली पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
अली याने कनेन (१३) आणि सुझेन (८) या त्याच्या दोन मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याचे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दोघींच्या तोंडावर चिकटपट्टी लावली होती. तसेच त्यांचा गळा दाबून त्यांना मारण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दोन्ही मृत मुलींचे शवविच्छेदन अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेले नसल्याने मृत्यूचे नेमके कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. अली हा किडनीशी संबंधित गंभीर आजाराने ग्रस्त होता, अशीही माहिती आहे. आजारपण आणि व्यवसायात मंदीमुळे तो निराश झाला होता. त्यातच त्याने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. दरम्यान, पोलीस याबाबत त्याचे नातेवाईक तसेच मित्रमंडळींचे जबाब नोंदवत आहेत.
........................................