Sushant Singh Rajput Death Case: शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना गोवण्याचा प्रयत्न करताहेत- नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 01:43 PM2020-08-21T13:43:12+5:302020-08-21T13:53:12+5:30

Sushant Singh Rajput Death Case: शिवसेनेत जुने विरुद्ध नवे असा वाद; त्यातूनच आदित्य ठाकरेंचं नाव पुढे आलं; नितेश राणेंचा दावा

Sushant Singh Rajput Death Case shiv sena leaders trying to trap aaditya thackeray claims bjp leader nitesh rane | Sushant Singh Rajput Death Case: शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना गोवण्याचा प्रयत्न करताहेत- नितेश राणे

Sushant Singh Rajput Death Case: शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना गोवण्याचा प्रयत्न करताहेत- नितेश राणे

Next

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून भाजपा नेते नितेश राणेंनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष केलं आहे. शिवसेनेत जुने विरुद्ध नवे असा संघर्ष सुरू असून त्यातूनच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला फक्त आदित्य ठाकरेंचं नावच का घ्यावंसं वाटलं, त्यांना कधीच भेटलो हे का सांगावंसं वाटलं, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. आम्ही सीबीआयला या दृष्टीनं तपास करण्याची विनंती करणार असून त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचीदेखील आमची तयारी असल्याचं ते म्हणाले.

'आम्ही कोणीही आदित्य ठाकरेंचं नाव घेतलेलं नाही. आम्ही केवळ तरुण मंत्री असा उल्लेख केला. कॅबिनेटमध्ये अनेक तरुण मंत्री आहेत. मग त्यांच्यापैकी आदित्य ठाकरे यांनीच का स्पष्टीकरण दिलं?,' असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला. मंत्रिमंडळात अमित देशमुख, अदिती तटकरे, अस्लम शेख हेदेखील तरुण मंत्री आहेत. मात्र त्यांना स्पष्टीकरण द्यावंसं का वाटलं नाही?, असा प्रश्नहीदेखील त्यांनी विचारला.

शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना या प्रकरणात गोवत असल्याचा आरोप त्यांनी केला. 'अनिल परब यांनीच ट्विट करून १३ तारखेला पार्टी झाल्याचं सांगितलं. त्यामुळे अनिल परब यांना काय माहिती आहे, त्याची चौकशी व्हायला हवी. विरोधकांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन आरोप करावेत, असं आव्हान देऊन खासदार संजय राऊतच स्वत: आदित्य ठाकरेंचं नाव वारंवार घेत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना गोवत आहेत,' असा आरोप राणेंनी केला.

काँग्रेसप्रमाणेत आता शिवसेनेतही जुने विरुद्ध नवे असा संघर्ष सुरू झाला असून त्यातूनच आदित्य ठाकरेंना सुशांत प्रकरणात गुंतवण्याचा प्रकार सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. 'शिवसेनेत जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. म्हणून आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केलं जातं आहे. यातून विरोधकांना नाहक बदनाम करण्याचं षडयंत्र रचण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणी अनिल परब आणि संजय राऊत यांनी स्पष्टीकरण द्यावं,' अशी मागणी त्यांनी केली.

काय म्हणाले होते संजय राऊत?
अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी कुणीही हवेतल्या गप्पा मारू नये, हिंमत असेल तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचे नाव घेऊन आरोप करा, असे आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला दिले आहे. 

सोमवारी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे हे राजकारणातील उभरतं नेतृत्व आहे. त्यांचे खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून ते चांगले काम करत आहेत. त्यांचे हे काम अनेकांना खूपत आहे. कोविड सेंटर उभारण्यात त्यांची मोठी कामगिरी आहे. एका चांगल्या नेतृत्वाला हा बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असून हे खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावले आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी कुणीही हवेतल्या गप्पा मारू नये, हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंचे नाव घेऊन आरोप करा. पुरावे घेऊन पुढे या, असे थेट आव्हान संजय राऊत यांनी भाजपाला केले आहे. तसेच, मुंबई पोलीस सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, पहिल्या दिवसांपासून तपासात अडथळे आणले जात आहेत. खोटी माहिती जोडली जात आहे. खोटेपणाची सुरुवात ज्यांनी केली. त्यांनी आता माघार घ्यावी. जे लोक मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ते लोक आपल्याच राज्याची बदनामी करत आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

सुशांतच्या संपत्तीचा वारस ठरला! वडिलांनी घेतला 'हा' मोठा निर्णय, म्हणाले...

सीबीआय कामाला लागली; एका अज्ञात व्यक्तीला घेऊन चौकशीसाठी गेस्ट हाऊसवर पोहोचली

रिया 'त्या' गोष्टीबाबत पोलिसांसोबत खोटं बोलली का? महेश भट्टसोबतच्या चॅटींगमधून संशय वाढला!

Web Title: Sushant Singh Rajput Death Case shiv sena leaders trying to trap aaditya thackeray claims bjp leader nitesh rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.