Join us  

रायगडच्या ‘त्या’ नराधमास सुप्रीम कोर्टाने जिवंत सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 5:40 AM

शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या विरन ग्यानलाल राजपूत या गुन्हेगाराची फाशीची शिक्षा रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने त्याऐवजी गुरुवारी त्यास जन्मठेपेची शिक्षा दिली.

मुंबई : रायगड जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यातील कामथेकरवाडी या गावातील १३ वर्षांच्या शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या विरन ग्यानलाल राजपूत या गुन्हेगाराची फाशीची शिक्षा रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने त्याऐवजी गुरुवारी त्यास जन्मठेपेची शिक्षा दिली.गुन्हा करतानाचे आणि त्यानंतरचेही आरोपीचे निर्ढावलेपण पाहता तुरुंगात तो सुधारण्याची शक्यता दिसत नाही. हा गुन्हा एवढा भयावह आहे की आरोपी जिवंत राहणे समाजास घातक आहे, असे म्हणून माणगाव येथील सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली होती.मात्र अपिलात ती कमी करताना न्या. एन.व्ही. रमणा, न्या. मोहन शांतनदोदूर आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने म्हटले की, आरोपीचा गुन्हा घृणास्पद आहे , हे आम्हालाही मान्य आहे. मात्र ‘विरळात विरळा’ या वर्गात मोडण्याएवढा आणि ज्यासाठी केवळ फाशी हिच शिक्षा दिली जाऊ शकते एवढा तो दुष्टपणाचा, निंद्य व भयानक आहे, असे आम्हाला वाटत नाही. शिवाय आरोपी सुधारण्याची सूतराम शक्यता नाही, हेही आम्हाला पटत नसल्याने त्याचे जिवंत राहणे समाजास घातक ठरेल, असेही आम्हास वाटत नाही. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणे, तरुण वय आणि तुरुंगातील त्याची वागणूक या आरोपी सुधारण्याच्या दृष्टीने आम्हाला जमेच्या बाजू वाटतात.तरीही साधी जन्मठेप देणे महिला व मुलींवरील अशा प्रकारच्या गुन्ह्यांना जरब बसविण्यास पुरेसे होणार नाही हे लक्षात घेता या आरोपीला जन्मठेप म्हणून कोणतीही सवलत न मिळता किमान २० वर्षांचा कारावास भोगावा लागेल, असा आदेश खंडपीठाने दिला.बलात्कार व खून झालेली ही मुलगी पेडाळी येथील शारदा विद्यामंदिर शाळेत इयत्ता नववीत होती. कामथेकरवाडीपासून चार किमी चालत ती शाळेत जायची. १७ आॅक्टोबर २०१२ रोजी सायंकाळी वेळ टळून गेली तरी शाळेतून घरी आली नाही म्हणून घरच्या लोकांनी तिची शोधाशोध सुरु केली. दुसºया दिवशी पहाटे गावाजवळच्या झुडपांत ओढणीने गळा आवळलेल्या स्थितीत तिचा मृतदेह मिळाला.मुलगी ज्या दिवशी बेपत्ता झाली त्याच दिवशी काही लोकांनी तिला शाळेतून एकटीच परत येताना व तिच्यामागून अनोळखी माणूस चालत असताना पाहिले होते. अंबा नदीच्या काठी पारधी लोकांनी पाले टाकली होती. तो माणूस कदाचित त्यांच्यापैकी असावा या संशयाने काही लोक पारधी वस्तीवर गेले. तेथे तो माणूस सापडला. पोलिसांनी पकडल्यावर त्यानेच मुलीचे प्रेत व कपडे कुठे लपवून ठेवले हे दाखविले होते.>गुन्हे निर्विवाद सिद्धकोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसूनही तिन्ही न्यायालयांमध्ये विरन राजपूत याच्याविरुद्धचे सर्व गुन्हे निर्विवादपणे सिद्ध झाले. उच्च न्यायालयात त्यावेळच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश न्या. विजया कापसे-तहिलरामाणी व न्या. श्रीमती आय. के. जैन या दोन महिला न्यायाधीशांनी फाशी कायम केली होती. सहाय्यक पब्लिक प्रॉसिक्युटर अरफान सेठ यांनी त्यासाठी घेतलेल्या विशेष मेहनतीची खास नोंद घेतली गेली होती. ती मेहनत सर्वोच्च न्यायालयातही फळाला आली.