Join us

उन्हाळी पिकेही धोक्यात

By admin | Updated: March 14, 2015 22:05 IST

दोन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण आहे. त्यातच शनिवारी पहाटे पाऊस पडल्याने उन्हाळ्यातील शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

कार्लेखिंड : दोन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण आहे. त्यातच शनिवारी पहाटे पाऊस पडल्याने उन्हाळ्यातील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाळा संपल्यानंतरही प्रत्येक महिन्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. रायगड जिल्ह्यात भातपिकानंतर आंबा, तोंडली, वाल, घेवडा अशा अनेक कडधान्यांचे व भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. परंतु यावर्षी पावसाने मात्र बळीराजाची पाठ काही सोडली नाही.पावसामुळे शेतजमीन अंबळली असून शेतात लावलेले तोंडली, दुधी, कारली, घोसाळी यांचे मांडव जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे सतत नुकसान होत आहे. शेतातील तयार झालेली कडधान्ये काढून पुढच्यावर्षी बियाणे करण्यासाठी ते घराच्या छपरावर व शेतामध्ये वाळत टाकण्यासाठी ठेवली जातात. ही प्रक्रिया या दिवसांमध्ये चालू असते. परंतु शनिवारी झालेल्या पावसाने कडधान्य भिजले आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी बी पेरल्यानंतर रुजणार नाही. स्वत:कडील बियाण्याला चव चांगली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वाळलेली चिंचही पावसामध्ये भिजली आहे. एकंदरीत संपूर्ण वर्षभर घरात साठा करुन गृहोपयोगी ठरते ती वस्तू टिकणार नाही. यंदाच्या अवकाळी पावसामुळे शेतकरीवर्गाच्या आर्थिक उत्पन्नात घट झाली आहे.च्मोहोपाडा : रसायनी व परिसरात अवकाळी पावसाची संततधार शनिवारी पहाटेपासूनच सुरू झाल्याने वीटभट्टी व्यावसायिकांची , शेतकऱ्यांची धावाधाव झाली. सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने हवेत गारवा होता. त्यानंतर पावसाची रिपरिप सुरू झाल्याने अनेकांनी घरीच राहणे पसंत केले. पावसाची सुरूवात झाल्याने परिसरातील वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर शेवटच्या टप्प्यातील तयार झालेल्या पक्क्या विटा भिजल्याने वीटभट्टी व्यावसायिक हवालदिल झाला. परिसरात लहानग्यांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला.रेवदंडा : पहाटे साडेपाचच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. अनेक नागरिक झोपेत असल्याने त्यांना विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर पावसाने सुरुवात केली हे लक्षात आले. अवकाळी पावसाने सुपारी बागायतदारांबरोबर आंबा पीक, विविध कडधान्ये पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानीने झोप उडवली आहे. वारंवार पडणाऱ्या अवकाळी पावसाने कोकम फळांना फटका बसला आहे. हवेत उष्मा वाढल्याने रोगराईची भीती व्यक्त करण्यात येत आहे.