गोड बातमी ! संसर्गाच्या जीवाणूविराेधात साखर ठरणार अँटिबायोटिक, आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांचे संशाेधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 07:57 AM2021-03-30T07:57:13+5:302021-03-30T08:15:01+5:30

आयआयटी, मुंबईच्या केमिस्ट्री विभागाचे संशोधक प्राध्यापक सुवर्ण कुलकर्णी यांनी या जीवाणूंच्या पेशीभित्तीका कमकुवत करणाऱ्या साखरेचे संशोधन केले आहे.

Sugar to be antibiotic against infectious bacteria, research by IIT Mumbai professors | गोड बातमी ! संसर्गाच्या जीवाणूविराेधात साखर ठरणार अँटिबायोटिक, आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांचे संशाेधन

गोड बातमी ! संसर्गाच्या जीवाणूविराेधात साखर ठरणार अँटिबायोटिक, आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांचे संशाेधन

Next

 - सीमा महांगडे
मुंबई : जीवाणूंचे बाह्यआवरण (पेशीभित्तीका) मोनोसॅकेराइड्स आणि प्रथिनांपासून बनते. जीवाणूंच्या विवध पेशींसाठी वेगवेगळ्या रचनात्मक भिन्नता असलेल्या साखरेचा बाह्यआवरणात वापर होतो. जिवाणूंची ही पेशीभित्तीका त्यांचे संरक्षण तर करतेच, साेबतच मानवी शरीरात संसर्ग करण्यासाठी मदतही करते. आपण आजारी असताना संसर्ग कमी व्हावा म्हणून ज्या प्रतिजैविकांचा म्हणजेच अँटिबायोटिक्सचा वापर करतो, ते जीवाणू त्याविरुद्धच प्रतिकारशक्ती विकसित करत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. आयआयटी, मुंबईच्या केमिस्ट्री विभागाचे संशोधक प्राध्यापक सुवर्ण कुलकर्णी यांनी या जीवाणूंच्या पेशीभित्तीका कमकुवत करणाऱ्या साखरेचे संशोधन केले आहे. (Sugar to be antibiotic against infectious bacteria, research by IIT Mumbai professors)

संशोधनात बेंझाइल आणि फ्लुरो रासायनिक गटांतील साखरेचे पृथक्करण केल्यानंतर त्यांना या विशिष्ट साखरेचे तीन प्रकार सापडले. सवयीप्रमाणे जीवाणू या विशिष्ट साखरेला अन्न म्हणून वापरतात. पर्यायाने ही साखर जीवाणूंच्या शरीरात गेल्यावर त्यांची पेशीभित्तीका कमकुवत करत असल्याची माहिती प्राध्यापक कुलकर्णी यांनी दिली. या विशिष्ट साखरेमुळे जीवाणूंची वाढ थांबते. पारंपरिक वापरातील प्रतिजैविक औषधांना पर्याय म्हणून याचा वापर होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले. नवीन पद्धती असल्यामुळे जीवाणूंना यांच्याविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार करणे अवघड ठरणार असून, शरीरातील ठराविकच रोगकारक जीवाणूंना लक्ष्य करणे शक्य असल्याचेही कुलकर्णी म्हणाले.

वर्षानुवर्षे जीवाणूंविरूद्ध आपण प्रतिजैविकांचा वापर करत आहाेत. सतत संपर्कात आल्यामुळे जीवाणूंनी प्रतिजैविकांविरुद्ध जगण्याची क्षमता निर्माण केली आहे. पर्यायाने ते औषध निष्प्रभ ठरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांना दर काही वर्षांनी प्रतिजैविकांत बदल करत नवीन औषधे तयार करावे लागते. बहुतेक जीवाणूंनी प्रतिजैविकांविरुद्ध प्रतिकारशक्ती विकसित केली. त्यामुळे जीवाणूंविरुद्ध नव्या औषधांची गरज आहे. यावर उपाय शोधण्यासाठी शास्त्रज्ञ  प्रयोग करत आहेत. प्राध्यापक कुलकर्णी यांचे हे संशोधन याचाच एक टप्पा असून, विशिष्ट साखरेचा अशा विषाणूंची वाढ रोखण्यासाठी वापर करणे शक्‍य असल्याचे त्यांनी संशोधनांतून सिद्ध केले. प्रा. कुलकर्णी आणि अमेरिकेतील बावडोइन महाविद्यालयाचे प्रा. डॅनिअल डुबे यांचे हे संशोधन ‘जर्नल ऑफ केमिकल सायन्सेस’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

उपचारासाठी वापर करणे शक्य
आपल्याच शरीरातील घटकांचा वापर करून, निदान करून उपचारासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो, हे या नवीन साखरेच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. या संशोधन पद्धतीवर अद्याप पुढील काम सुरू आहे. त्यामुळे यातून अजून बरेच उलगडे होणे बाकी असल्याने उत्सुकताही आहे.
- प्राध्यापक सुवर्ण कुलकर्णी,  शास्त्रज्ञ, आयआयटी, मुंबई.

Web Title: Sugar to be antibiotic against infectious bacteria, research by IIT Mumbai professors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.