Join us  

मुंबई विमानतळावर ध्वनिरोधक बसवण्याबाबत अभ्यास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 12:58 AM

देशातील व्यस्त विमानतळांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी ध्वनिरोधक बसवण्याबाबत विमानतळ प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

- खलील गिरकरमुंबई : देशातील व्यस्त विमानतळांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी ध्वनिरोधक बसवण्याबाबत विमानतळ प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. विमानतळ परिसरात ध्वनिरोधक बसवणे कितपत व्यवहार्य आहे, याचा अभ्यास सध्या स्पेनच्या कंपनीद्वारे केला जात आहे. ध्वनिरोधक बसवणे शक्य आहे का व त्याचा कितपत लाभ होईल याबाबत कंपनी आपला अहवाल सादर करणार आहे. हा अहवाल सकारात्मक आल्यास ध्वनिरोधक बसवण्याबाबत पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.विमानतळ परिसरात विमानांच्या उड्डाणाने व लँडिंगने मोठा आवाज होत असतो. त्यामुळे अनेकदा ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी केल्या जातात. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात स्पेनच्या कंपनीने याबाबत अभ्यास केला असून त्याचा अहवाल लवकरच येण्याची शक्यता आहे. सध्या विमानतळावरील आवाजाची पातळी तपासण्यासाठी ६ स्थानके कार्यरत आहेत. त्यापैकी २ स्थानके कायमस्वरूपी आहेत. धावपट्टी शेजारी घाटकोपर दिशेला व जुहू दिशेला अशी ही दोन स्थानके आहेत. विमानतळावरील आवाजाबाबतचा अहवाल वर्षात एकदा नागरी विमान वाहतूक महासंचालकांकडे (डीजीसीए) पाठवण्यात येतो. कोणत्या विमानाचा आवाज किती आहे, लँडिंगच्या वेळचा आवाज, उड्डाणाच्या वेळेचा आवाज याबाबत या स्थानकांद्वारे नोंदी घेतल्या जातात. अधिक आवाज असलेल्या विमानांबाबत संंबंधित विमान कंपन्यांना देखील कळवले जाते.सध्या दररोज सुमारे ९४५ विमानांचे परिचालन मुंबई विमानतळावरून केले जाते. सध्याच्या आवाजाची पातळी आणखी कमी करण्यासाठी विमानांच्या इंजिनाचा आवाजाची पातळी कमी करणे, विमान उड्डाणासाठी सज्ज होताना धावपट्टीवर जाण्यासाठी प्रतिक्षा करावी लागू नये यासाठी उपाययोजना करणे, यासह विविध उपाय योजले जात आहेत. एअरपोर्ट कोलॅबोरेटिव्ह डिसिजन मेकिंग (ए-सीडीएम) प्रणालीचा वापर करून उड्डाण करण्यापूर्वी धावपट्टीवर प्रतिक्षा करावी लागू नये यासाठी विमानाचे पुश बॅक शेवटच्या क्षणाला केले जाते. तोपर्यंत विमानाचे इंजिन सुरू केले जात नाही. विमानाचे उड्डाण करताना व लँडिंग झाल्यानंतर विमानाचा टॅक्सिंग टाईम (प्रतिक्षा वेळ) कमी करण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे इंधन बचत व ध्वनि प्रदूषणात घट ही दोन्ही उद्दिष्टे गाठण्यात प्रशासनाला यश मिळत आहे.विमानात शुध्द हवा उपलब्ध व्हावी व वातानुकूलित यंत्रणा सुरू ठेवण्यासाठी विमानाचे इंजिन सुरू ठेवावे लागते, त्याला पर्याय म्हणून फिक्स्ड इलेक्ट्रिकल ग्राऊंड पॉवर व प्री कंडिशन्ड एअर (पीसीए) या प्रणालीचा वापर केला जात आहे.आवाज कमी होईल...लँडिगनंतर विमान पार्किंगमध्ये जाताना टॅक्सी वे मध्ये जाताना विलंब होऊ नये यासाठी रॅपिड टॅक्सी वे ची निर्मिती केली जात आहे. विमान पार्क करण्याच्या जागेची (एप्रॅन) सुधारणा करण्यात येत आहे. टर्मिनल १ व टर्मिनल २ च्या पार्किंगचा भाग जोडण्यासाठी वाहनांचा मार्ग तयार करण्यात येत आहे, या सर्व उपाययोजनांमुळे सध्यापेक्षा कमी आवाज होईल, असा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला.

टॅग्स :विमानतळ