Join us  

विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना मिळणार, मुंबई विद्यापीठाकडून प्राणिशास्त्र विषयातील पदवीच्या विद्यार्थ्यांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 5:54 AM

मुंबई विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विषयातील पदवीच्या विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी विद्यापीठाने एक पाऊल पुढे टाकले आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विषयातील पदवीच्या विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी विद्यापीठाने एक पाऊल पुढे टाकले आहे. यानुसार, आता प्राणिशास्त्र विषयातील पदवीच्या पाचव्या आणि सहाव्या सत्रातील विद्यार्थ्यांना पर्यायी संशोधनाची संधी मिळणार असून, त्यासाठी विद्यार्थ्यांना दोन क्रेडिटही बहाल करण्यात येणार आहेत. सदर अभ्यासक्रमाच्या समितीचे निमंत्रक विनायक दळवी यांच्या संकल्पनेतून या अभिनव प्रयोगाला सुरुवात होत असून, नुकत्याच झालेल्या विद्यापरिषदेमध्ये याबाबत ठराव संमत करण्यात आला आहे.गेल्या वर्षी प्राणिशास्त्र विषयाच्या पाचव्या आणि सहाव्या सत्रातील विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्प अनिवार्य करण्यात आला होता. मात्र, याबाबत विद्यार्थी आणि शिक्षक संवर्गातून संमिश्र प्रतिक्रिया प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार, प्रा. विनायक दळवी यांनी प्रगत शिक्षणाधारित विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना मिळावी, तसेच संशोधनातून समाज जीवन सुसह्य व्हावे, यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पर्यायी संशोधन प्रकल्पाची मांडणी करून, अतिरिक्त क्रेडिटची सुविधा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.यानुसार, विद्यार्थ्यांना पदवीच्या पाचव्या, सहाव्या सत्रामध्ये पर्यायी संशोधन प्रकल्पावर काम करता येईल. त्यासाठी त्यांना कोणत्याही संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांची, औद्योगिक प्रकल्पातील विशेष तज्ज्ञांची मदत घेण्याचे स्वातंत्र्य आहे. यामध्ये गुणवत्तेनुसार मूल्यमापन केले जाणार असून, पदव्युत्तर स्तरावर संशोधन करण्यासाठी, तसेच परदेशी शिक्षण घेऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. मात्र, हे अतिरिक्त क्रेडिट विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवीच्या गुणपत्रकांमध्ये नमूद केले जाणार नसून, त्यांना वेगळे प्रमाणपत्र देण्यात येईल. विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठीच हा प्रयत्न असल्याचे प्राणिशास्त्र अभ्यास मंडळाच्या निमंत्रक प्राचार्या डॉ. वासंती कच्छी यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई विद्यापीठशिक्षण क्षेत्र