सचिन लुंगसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भटक्या कुत्र्यांची मुंबईमध्ये पुन्हा दहशत वाढली आहे. मुंबईत कुठेना कुठे दररोज श्वान दंशाच्या घटना घडतच असतात. श्वान दंशामुळे प्राण गमावावा लागल्याच्या घटनाही मुंबई, ठाणे परिसरात घडल्या आहेत.
बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर बोरीवलीसह कांदिवली, पवई, आरे कॉलनी, मुलुंड व भांडुप या परिसराला लागून आहे. या उद्यानासह आरे कॉलनीत वावरणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यामागे भटक्या कुत्र्यांची वाढती संख्याही कारणीभूत आहे. यावर उपाय म्हणून उद्यान परिसरातील कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी लसीकरण, उद्यान परिसरातील स्वच्छतेवर भर देण्याची गरज आहे. तसे केले तरच कुत्र्यांची संख्या वाढणार नाही आणि बिबट्यांचे हल्लेही होणार नाहीत, असा आशावाद प्राणिमित्रांनी व्यक्त केला आहे.
संजय गांधी उद्यान व परिसरात ५० हून अधिक बिबट्यांचा वावर आहे. उद्यान परिसराला लागून मोठी वस्ती आहे. उद्यानात अतिक्रमण करू नये म्हणून सीमा भागांत संरक्षण भिंती बांधल्या आहेत. मात्र, संरक्षण भिंती हा या वरचा उपाय नाही, असे प्राणिमित्रांचे म्हणणे आहे.
यंत्रणांनी एकत्र येण्याची गरज
कुत्रे हे बिबट्याचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे त्यांच्या शोधात बिबट्या मनुष्यवस्तीत येतो. कचरापेट्या किंवा अस्वच्छता असलेल्या परिसरात कुत्र्यांची संख्या अधिक असते. याच परिसरात मग बिबट्याचे हल्ले वाढतात. हे हल्ले थोपवायचे असतील तर पहिल्यांदा उद्यान परिसर स्वच्छ ठेवावा लागेल. कचरापेट्या नियमित स्वच्छ कराव्या लागतील. परिसरातील कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी लसीकरण मोहीम राबवावी लागेल. कुत्र्यांची संख्या नियंत्रित राहिल्यास श्वान देशाचे धोके कमी होतील. उपाययोजना केल्यास कुत्रे कचरापेट्यांकडे जाणार नाहीत आणि बिबटे त्यांच्याकडे आकर्षित होणार नाही. मात्र यासाठी उद्यान प्रशासन आणि पालिका यांनी एकत्रित काम केले पाहिजे.
भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करून पालिका त्यांना कुठेही सोडून देते. त्यांना त्यांच्या पूर्वीच्याच परिसरात सोडले पाहिजे. कुत्र्यांना नव्या परिसरात सोडल्यावर त्यांचे एकमेकांवरचे हल्ले होतात. मग नंतर माणसांवरच्या हल्ल्यात वाढ होण्याची शक्यता असते. दुसरे म्हणजे श्वान सहसा ओळखीच्या व्यक्तीवर हल्ले करत नाही. आणि केले, तर सुरक्षेसाठी झालेले हल्ले असतात. - सुनीष कुंजू, वन्यजीव रक्षक