Join us  

किंग्ज सर्कल स्थानकावर प्रवाशांचा रेल रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 2:33 AM

पादचारी पूल बंद असल्याने संताप : दहा मिनिटे सेवा थांबली

मुंबई : मुंबई हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कल स्थानकाला जोडलेले दोन पादचारी पूल बंद केल्यामुळे प्रवाशांना स्थानक गाठणे कठीण झाले आहे. याचा प्रवाशांनी संताप व्यक्त करण्यासाठी किंग्ज सर्कल स्थानकातून गुरुवारी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या लोकलचा मार्ग अडविला. त्यानंतर १० मिनिटांत प्रवाशांनी रेल्वे रोको मागे घेतल्याने लोकल वाहतूक सुरळीत सुरू झाली. दरम्यान, प्रवाशांचे प्रचंड हाल झाले़

किंग्ज सर्कल स्थानक गाठण्यासाठी सोईस्कर असलेले दोन्ही पादचारी पूल बंद केल्याने आता प्रवाशांना स्थानक गाठणे कठीण झाले आहे. मागील दोन दिवस रेल्वे प्रवाशांना स्थानक गाठण्यासाठी वेगवान वाहतूक असलेला डॉ. बी. ए. मार्ग ओलांडून जाणे भाग पडत आहे. या मार्गाच्या मध्ये रस्तादुभाजक असल्याने प्रवाशांची दुभाजकाच्या ठिकाणी गर्दी जमा होते. परिणामी, वेगाने येणाºया गाड्यांमुळे रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता प्रवाशांनी व्यक्त केली आहे. गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक यांना येथून प्रवास करणे कठीण झाले आहे, अशी प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिली.किंग्ज सर्कल स्थानकाजवळील डॉ. बी. ए. मार्गावर झेब्रा क्रॉसिंगसह सिग्नल यंत्रणा, वाहतूक पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात यावेत, अशी मागणी रहिवाशांनी केली. गुरुवारी बंद करण्यात आलेल्या पादचारी पुलांची पाहणी पालिका अधिकारी, रेल्वे अधिकारी, पोलीस, स्थानिक नगरसेविका यांनी केली. या पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी प्रवाशांना नानालाल मेहता उड्डाणपुलाखालून मार्ग खुला करावा. बंद केलेल्या पुलाचे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करण्याच्या सूचना स्थानिक नगरसेविका यांनी संबंधित पालिका अधिकाऱ्यांना दिल्या.किंग्ज सर्कल स्थानकाच्या बाहेरील पादचारी पूल बंद असल्याने नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी जवळील माटुंगा पुलाखाली व्यवस्था करावी. यासह रस्त्यांच्या दुतर्फा रेलिंग लावण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.बेस्टची फ्री बस सेवाकिंग्ज सर्कल पोलीस ठाणे ते गांधी मार्केट आणि गांधी मार्केट ते अरोरा ब्रिज येथे बेस्ट बसच्या मोफत फेºया चालविण्यात येणार आहेत. पुलाचे काम होईपर्यंत बसच्या फेºया चालविल्या जाणार आहेत. प्रवाशांना लवकर स्थानक गाठण्यासाठी दोन बस या मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. स्थानिक नगरसेविका यांच्या सहकार्याने बेस्टच्या बसची मोफत सेवा गुरुवारी चालविण्यात आली.पालिकेच्या अजब सूचनाच्किंग्ज सर्कल स्थानकाजवळील पादचारी पूल बंद करण्यात आल्याने पर्यायी मार्गासाठी ‘मानव सेवा संघ’समोरील आणि ‘अरोरा जंक्शन’जवळील पादचारी क्रॉसिंगचा वापर करण्यात यावा, अशा सूचना पालिकेने दिल्या आहेत. मात्र स्थानकापासून २ मिनिटांच्या अंतरावरील रस्ता सोडून १५ मिनिटांचे अंतर पार करण्याची पालिकेची सूचना अजब असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.च्रहिवाशांनी डॉ. बी. ए. मार्ग अनधिकृतपणे ओलांडू नये. ज्या ठिकाणी अधिकृत पादचारी क्रॉसिंग असेल, त्या ठिकाणाहून रस्ता ओलांडण्याच्या सूचना पालिकेने रस्त्यावर फलक लावून दिल्या आहेत. असे फलक लावून पालिकेने आपली जबाबदारी झटकली आहे. पालिकेने सोईस्कर पर्यायी मार्ग उपलब्ध न करता या प्रकरणातून हात मोकळे केले आहेत, अशी भूमिका व्यक्त केली. 

टॅग्स :मुंबई