Stop listening now; When will you talk about failure? | नुसतेच ऐकून घेणे आता बंद करा; अपयशाची चर्चा कधी करणार?
नुसतेच ऐकून घेणे आता बंद करा; अपयशाची चर्चा कधी करणार?

अतुल कुलकर्णी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला, त्याची चर्चा कधी करणार? आम्ही जे सांगतो ते किती दिवस नुसतेच ऐकून घेणार? बैठकांचे फार्स कशासाठी? असे सवाल आता काँग्रेसचे नेतेच उपस्थित करत आहेत. या अस्वस्थतेचे पडसाद गुरुवारपासून होणाऱ्या बैठकीत उमटण्याची शक्यता आहे.

गोपाळ अग्रवाल, जयकुमार गोरे, विश्वजीत कदम हे पक्ष सोडून जाणार अशा बातम्या आल्यानंतर ‘बघा, थांबता आले तर थांबा’ असा मानभावी सल्ला त्यांना दिला गेला. पक्षाला आमची गरज आहे की नाही, हे तरी एकदा कळू द्या, अशा शब्दांत या नेत्यांनी झाल्या प्रकाराच्या तक्रारी ज्येष्ठ नेत्यांकडे केल्या आहेत. तुम्ही बिलकूल जाऊ नका, आपण मिळून लढू, असेही कोणी बोलत नाही. आम्ही चार ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलो; मात्र आमच्यापेक्षा दुय्यम नेत्यांना बैठकीला नेले जाते, अशीही तक्रार करण्यात आल्याचे समजते.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचे उमेदवार ९० मतदारसंघांमध्ये तिसºया व चौथ्या नंबरवर होते. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस तसेच राष्टÑवादी काँग्रेस २८८ पैकी फक्त ५६ ठिकाणी पुढे आहे. अशा स्थितीत ज्येष्ठ नेते विधानसभेसाठी जातीय समीकरणे कशी असतील, कोणते नियोजन करायचे याची चर्चा करत नाहीत. टिळक भवनात याआधी झालेल्या बैठकीत आम्ही लोकसभा निवडणुकीच्या तक्रारी केल्या असता त्यावेळी आम्हालाच ‘तुम्ही कोर्टात जा’ असे सल्ले देण्यात आले ह ोते. आमचे म्हणणे ऐकून घेण्याचा फार्स केला जातो, मात्र त्यानंतर ाुढे काहीच होत नाही, असेही एका नेत्याने सांगितले.

आजवरच्या बैठकीत वंचित आघाडीमुळे पक्षाला फटका बसला अशी चर्चा झाली; पण पक्ष नेतृत्वाने जाणीवपूर्वक पक्षातल्याच तरुणांना पुढे आणण्यापासून वंचित ठेवले. त्याची चर्चा कोणी करायची, असे सांगून आम्ही सात सात तास बैठकीत बसतो; पण आम्हाला सात मिनिटेही बोलण्याची संधी मिळत नाही, मग बैठकीला जायचे तरी कशाला? असे एक नेता म्हणाला.

‘...तर पक्षात संवाद साधणार कसा?’
या सरकारचे शेवटचे अधिवेशन १७ जूनपासून सुरू होत आहे. त्यासाठी विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्ष नेता म्हणून नेमणूक करा, असा आग्रह खासदार अशोक चव्हाण यांनी धरला आहे. वडेट्टीवार हे ओबीसी नेते आहेत, विदर्भातील आहेत. त्यामुळे पक्षात सामाजिक समीकरणे साधता येतील असा चव्हाण यांचा प्रयत्न आहे. मात्र, त्यासाठीदेखील एकाही नेत्याशी चर्चा केली जात नसेल आणि परस्पर निर्णय होत असतील तर पक्षात संवाद कसा साधला जाईल, अशा तक्रारीही मोठ्या प्रमाणावर केल्याचे अनेकांनी सांगितले.


Web Title: Stop listening now; When will you talk about failure?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.