Join us  

शब्दांची घुसखोरी थांबवा, अभिजात मराठी भाषेचे संवर्धन करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 2:03 AM

समाजमाध्यमांमध्ये मराठीतून साधला जाणारा संवाद, स्फूट लेखन यांना प्रोत्साहित करण्याबरोबरच, मराठी भाषेवर इतर भाषांचे होणारे आक्रमण रोखले पाहिजे.

मुंबई : समाजमाध्यमांमध्ये मराठीतून साधला जाणारा संवाद, स्फूट लेखन यांना प्रोत्साहित करण्याबरोबरच, मराठी भाषेवर इतर भाषांचे होणारे आक्रमण रोखले पाहिजे. परकीय शब्दांकडे सोय म्हणून न पाहता, आपल्या अभिजात मराठी भाषेचे संवर्धन करण्याची तळमळ ठेवत, तिचे वैभव सांभाळले पाहिजे. शब्दांबरोबरच त्या परकीय संस्कृतीचेही आक्रमण आपल्यावर होत असते, हे ध्यानात घेतले पाहिजे व ही गुलामगिरी रोखली पाहिजे, असे परखड विचार ज्येष्ठ साहित्यिका विनया खडपेकर यांनी मांडले.मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या विलेपार्ले शाखेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने, एक दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन रविवारी विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात करण्यात आले. त्याचे उद्घाटन उद्योजक प्रसाद पाटील यांनी केले.या वेळी संमेलनाध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. संमेलनप्रमुख माधवी कुंटे, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू, भरारी प्रकाशनच्या लता गुठे व विश्वघर संस्थेच्या रेखा नार्वेकर यांच्या सहकार्याने झालेल्या या संमेलनात, स्वागताध्यक्ष डॉ. पुष्पा रमेश प्रभू, सुप्रसिद्ध साहित्यिक सुमेध रिसबूड व ज्येष्ठ साहित्यिका स्मिता भागवत यादेखील उपस्थित होत्या.ग्रंथसेवक हा वाचक आणि साहित्यिक यांच्यातील दुवा असून, त्याच्या कार्यामुळेच ग्रंथ व साहित्य अधिक समृद्ध आणि प्रौढ होते. त्यामुळे त्याचे महत्त्व विशेष अधोरेखित व्हायला हवे, असे मत सुमेध रिसबूड-वडावाला यांनी व्यक्त केले. स्मिता भागवत यांनी अनुवादित साहित्याचे प्रमाण वाढले पाहिजे व त्याचबरोबर, त्यात केवळ अनुवाद नको, तर भावानुवाद असला पाहिजे व अशा साहित्याच्या निर्मितीवर भर दिला गेला पाहिजे, असे मत मांडले.मराठी भाषेला ‘देवनागरी’ म्हणतात व ती देवांनी निर्माण केल्यामुळे कधीच लोप पावणार नाही, अशी आशा उद्योजक प्रसाद पाटील यांनी व्यक्त केली. नव्या पिढीला मराठी साहित्याशी जोडण्यासाठी साहित्यिकांनी व समाजातील विविध घटकांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे विचार अरविंद प्रभू यांनी मांडले.>साहित्य वाचणारे कमीचसध्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत असली, तरी वाचकांची संख्या कमीच आहे. केवळ समाजमाध्यमावरून संवाद न साधता, प्रत्यक्ष संमेलनातून चर्चांतून भेटले पाहिजे, मते व्यक्त केली पाहिजे, असे विचार रेखा नार्वेकर यांनी व्यक्त केले.