सुरेश ठमके, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिका आणि काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मुंबईतील तब्बल ७० टक्के भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली असून, त्यांच्या संख्येवर आता नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. हा त्रास आता दाटीवाटीच्या झोपडपट्ट्या आणि नवीन बांधकामाच्या ठिकाणीच आढळत असून तेथेही भटक्या कुत्र्यांच्या प्रजननावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोहीम राबवली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत पालिका अधिकारी डॉ. कलीमपाशा पठाण यांनी सांगितले की, मुंबई शहर आणि उपनगरात भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या वतीने कारवाई केली जाते. कुत्रे चावण्याचे प्रकार अथवा त्यांच्या उपद्रवाबाबत नागरिक श्वान प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करतात. या तक्रारी सातरस्ता, मुलुंड, मालाड आणि वांद्रे येथील श्वान प्रतिबंधक विभागाकडे थेट दाखल करता येतात. त्यानंतर पालिकेचे श्वान प्रतिबंधक पथक संबंधित ठिकाणी जाऊन श्वानांना पकडून आणतात. या श्वानांचे लसीकरण झाले नसेल तर त्यांचे लसीकरण केले जाते आणि नसबंदी झाली नसेल तर तीसुद्धा केली जाते.
महापालिका आणि सामाजिक संस्थांनी गेल्या नऊ वर्षांत एक लाख ४८ हजार ८४ कुत्र्यांची (७० टक्के) नसबंदी केली आहे. तर, दोन लाख १६ हजार ४३३ कुत्र्यांचे लसीकरण केले आहे. रेबीज झालेल्या कुत्र्यांनाच केवळ नागरिकांच्या सुरक्षेसाठी जीवे मारण्यात येते, अन्यथा बाकी कुत्र्यांना उपचारानंतर सोडून दिले जाते, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.
जागा पालिकेची, रुबाब ट्रस्टचा
सातरस्ता येथील जे. आर. बोरीचा मार्ग परिसरात भटक्या कुत्र्यांसाठीचे केंद्र आहे. या ठिकाणी पालिकेचे मोठे केंद्र होते. मात्र आता पुनर्विकासानंतर एका इमारतीत छोट्याशा जागेत पालिकेचे कार्यालय आहे. तर, शेजारी टाटा ट्रस्टचे प्राणी रुग्णालय आहे. भटक्या कुत्र्यांवर उपचारासाठी पालिकेला परळ किंवा शिवडी येथे पाठवावे लागते. मात्र, टाटा ट्रस्टच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात नाहीत. केवळ खासगी पाळीव प्राण्यांवरच तेथे उपचार होतात.