मुंबईत झोपडपट्टी परिसरात ‘हर्ड इम्युनिटी’च्या दिशेने पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 06:06 AM2020-07-31T06:06:23+5:302020-07-31T06:06:38+5:30

तज्ज्ञांचे मत : मात्र भविष्यातही खबरदारी बाळगण्याचे आवाहन

Steps towards 'Heard Immunity' in slum areas of Mumbai | मुंबईत झोपडपट्टी परिसरात ‘हर्ड इम्युनिटी’च्या दिशेने पाऊल

मुंबईत झोपडपट्टी परिसरात ‘हर्ड इम्युनिटी’च्या दिशेने पाऊल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पालिका प्रशासनाच्या वतीने शहर, उपनगरातील झोपडपट्टी परिसरात केलेल्या सेरो सर्वेक्षणात ५७ टक्के नागरिकांच्या शरीरात प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) तयार झाल्याचे दिसून आले आहे, तर इमारतींमध्ये राहणाऱ्या १२ टक्के नागरिकांच्या शरीरातही कोरोनाविरोधातील प्रतिपिंडे निर्माण झाली आहेत. त्यामुळे आता मुंबईतही हर्ड इम्युनिटी तयार झाल्याच्या अनुषंगाने विविध मुद्दे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तज्ज्ञांनुसार, सध्या झोपडपट्टीच्या परिसरात हर्ड इम्युनिटीच्या दिशेने पाऊल टाकल्याचे स्पष्ट होते.


याविषयी राज्याच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, हर्ड इम्युनिटी म्हणजेच समूह प्रतिकारशक्तीविषयी अजूनही समाजात अनेक गैरसमज आहेत. बºयाचदा हे गैरसमज सोशल मीडियामुळे होत असतात. पालिकेने नुकतेच केलेले सेरो सर्वेक्षण हा नमुना दाखल अभ्यास आहे, याविषयी मोठ्या प्रमाणात अभ्यास-विश्लेषण होणे गरजेचे आहे. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार, झोपडपट्टीत ५७ टक्के नागरिकांच्या शरीरात प्रतिपिंडे निर्माण झाली आहेत, ही चांगली बाब आहे. समाजातल्या भरपूर लोकांच्या शरीरात एखाद्या रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते, तेव्हा त्या रोगाचा परिणाम कमी होऊ लागतो. विशेष म्हणजे त्यासाठी १०० टक्के लोकांच्या शरीरात ही शक्ती निर्माण होण्याची गरज नाही. ७० टक्के लोकांच्या शरीरात ती तयार झाली तरी साथ आटोक्यात येते. म्हणजेच, सध्या आपण झोपडपट्टीच्या परिसरात हर्ड इम्युनिटीबाबत एक पाऊल पुढे टाकले असल्याचे डॉ. सुपे यांनी अधोरेखित केले. मात्र इमारतीतील केवळ १२ टक्के नागरिकांमध्ये प्रतिपिंडे दिसून आली, त्यामुळे या घटकांतून कोरोनाचा प्रादुर्भाव-प्रसार वाढण्याचा धोका आहे.

परिणामी, लोकांनी गाफील राहून चालणार नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.
डॉ. सारंग आव्हाड म्हणाले, एखाद्या रोगाची साथ पसरायला लागली की त्याचा संसर्ग अनेकांना होतो. ज्या वेळी समाजातल्या मोठ्या गटाला या रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि ही लोकसंख्या यातून बरी होते, तेव्हा या लोकांच्या शरीराराला रोगाशी कसे लढायचे हे माहीत होते, म्हणजेच त्यांच्या शरीरात या रोगासाठीची इम्युनिटी तयार होते. देशात किंवा राज्य पातळीवर हर्ड इम्युनिटीवर अवलंबून राहता येणार नाही, कारण आपल्या आरोग्य यंत्रणांसाठी कोरोना हा नवा आजार आहे. त्यात अजूनही विविध प्रकारचे संशोधन सुरू आहे. याउलट आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे, सामान्यांना दर्जेदार सेवा देण्यावर यंत्रणांनी भर द्यावा.

गाफील राहून चालणार नाही
झोपडपट्टीत ५७ टक्के नागरिकांच्या शरीरात प्रतिपिंडे निर्माण झाली आहेत, ही सकारात्मक बाब आहे. मात्र इमारतीतील केवळ १२ टक्के नागरिकांमध्ये प्रतिपिंडे दिसून आली, त्यामुळे या घटकांतून कोरोनाचा प्रादुर्भाव-प्रसार वाढण्याचा धोका असल्याने गाफील राहून चालणार नाही, असे मत राज्याच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी मांडले.

Web Title: Steps towards 'Heard Immunity' in slum areas of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.