Join us

शाळाबाह्य विद्यार्थ्यांची आकडेवारी फसवी

By admin | Updated: July 14, 2015 23:06 IST

पालघर जिल्हा प्रशासनाने शाळाबाह्य विद्यार्थ्यांची यादी नुकतीच जाहीर केली. परंतु या यादीतील आकडेवारी ही फसवी असून ग्रामीण व शहरी भागामध्ये हजारो विद्यार्थी आजही शाळाबाह्य आहेत.

वसई : पालघर जिल्हा प्रशासनाने शाळाबाह्य विद्यार्थ्यांची यादी नुकतीच जाहीर केली. परंतु या यादीतील आकडेवारी ही फसवी असून ग्रामीण व शहरी भागामध्ये हजारो विद्यार्थी आजही शाळाबाह्य आहेत. साक्षरतेची टक्केवारीही चुकीची असून इतर जिल्ह्याच्या तुलनेत पालघर जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण वाढलेले नाही. अनेक कुटूंबे रोजगारानिमित्त अन्य परिसरात स्थलांतरित होत असल्यामुळे प्रशासनाला योग्य ती आकडेवारी मिळू शकत नाही.वसई विरार परिसरात अनेक नाका कामगार आपल्या कुटूंबासहीत स्थायिक झाले आहेत. हे सर्व कोकण, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातून या परिसरात स्थायिक झाले आहेत. तर वीटभट्टीवर तसेच वाड्यांवर काम करणाऱ्या आदिवासी कुटूंबातील मुले पुर्वी भोंगाशाळा व वस्तीशाळेत शिकत असत. परंतु कालांतराने ही मुलेही शाळाबाह्य झाली. वास्तविक शाळाबाह्य विद्यार्थी व साक्षरतेचे प्रमाण निश्चित करताना योग्य ते सर्वेक्षण होत नसल्यामुळे खरी आकडेवारी समजू शकत नाही. सतत रोजगाराच्या शोधात स्थलांतरीत होणाऱ्या मुलांचा शाळाबाह्य विद्यार्थ्यांमध्ये समावेश होणे गरजेचे आहे. हे सर्व्हेक्षण करताना त्यांचे मुळ गाव व किती वर्षापासून परिसरात स्थलांतरीत झाले आहेत व शाळेत न जाण्यामागे कोणती कारणे आहेत याचा शोध घेतल्यास त्यांची खरे आकडेवारी तसेच त्यामागची कारणे प्रशासनाला कळू शकतील. हे सर्व्हेक्षण करताना जिल्हा शिक्षण प्रशासनाने शहरी व ग्रामीण भागातील बेकायदेशीर शाळा हुडकून काढाव्यात अशी ग्रामीण भागातील जनतेची मागणी आहे. पालघर जिल्हा अस्तित्वात येऊन सुमारे वर्षाचा कालावधी लोटला आहे. परंतु शिक्षण विभागातील अनागोंदी दुर करण्यास जिल्हा प्रशासनाला यश आलेले नाही.भोंगा व वस्तीशाळेतील आकडेवारी कुठे आहे? पालिकांची माहिती नाहीजिल्ह्यात डहाणू येथे सर्वाधिक शाळाबाह्य मुले असल्याचे दिसून आले आहे तर सर्वात कमी शाळाबाह्य मुले वसई तालुक्यात आहेत. शासकीय आकडेवारीनुसार केवळ ४९ मुलेच वसईत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु पुर्वी भोंगा व वस्तीशाळेत शिकणाऱ्या मुलांचे पुढे काय झाले याबाबतची माहीती याचा त्यामध्ये समावेश नाही. शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण ४ हजार ४०४ शाळाबाह्य मुले आहेत. या आकडेवारीत महानगरपालिका, नगरपरिषदांच्या हद्दीतील आकडेवारी उपलब्ध नाहीत. शहरी भागातही शाळाबाह्या मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामध्ये नाका कामगार व विटभट्टीवर काम करणारे आदिवासी मुलांचा समावेश आहे.