Join us  

राज्य शासनाने पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा कहर वाढत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकार वृत्तांकन करून जनतेपर्यंत महत्त्वाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचा कहर वाढत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकार वृत्तांकन करून जनतेपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवीत असतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने कोरोना योद्ध्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी आरपीआयचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

पंजाब, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार या राज्यांनी त्यांना कोरोना योद्ध्याचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्र राज्य नेहमी पत्रकारांचा सन्मान करणारे राज्य आहे. मात्र आता राज्यात महाविकास आघाडी सरकारचे पत्रकारांच्या बाबतीत उपेक्षेचे धोरण दिसत आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेमध्येही पत्रकारांचा समावेश केलेला नाही. परिणामी पत्रकार, कॅमेरामन, फोटोग्राफर यांना रेल्वे प्रवास करता येत नाही. ही खेदजनक बाब आहे. सरकारने पत्रकारांच्या मागण्यांची उपेक्षा करू नये. राज्यातील पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा देऊन त्यांचा सन्मान राखावा. महाराष्ट्रात कोरोनाच्या या बिकट काळात १२४ पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने सांत्वनपर ५० लाखांचा मदत निधी दिला पाहिजे. पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा देऊन त्यांना लसीकरणामध्ये प्राधान्य द्यावे, अशी मागणी आठवले यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.