Join us  

राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंचीही उच्चांकी नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 4:06 AM

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर कायम असून निर्बंधानंतर संसर्ग नियंत्रणात नसल्याचे दिसून आले आहे. राज्यात मागील २४ तासांत दैनंदिन ...

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर कायम असून निर्बंधानंतर संसर्ग नियंत्रणात नसल्याचे दिसून आले आहे. राज्यात मागील २४ तासांत दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंची उच्चांकी नोंद झाली आहे. राज्यात शनिवारी ६७ हजार १२३ रुग्णांची नोंद तर ४१९ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ३७ लाख ७० हजार ७०७ झाली असून मृतांचा आकडा ५९ हजार ९७० झाला आहे. सध्या ६ लाख ४६ हजार ९३३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात दिवसभरात ५६ हजार ७८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३० लाख ६१ हजार १७४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.१८ टक्के झाले असून मृत्युदर १.५९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ३५ लाख ८० हजार ९१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.९९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३५ लाख ७२ हजार ५८४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २५ हजार ६२३ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दिवसभरात नोंद झालेल्या ४१९ मृत्यूंमध्ये मुंबई ५१, ठाणे मनपा ९, कल्याण डोंबिवली मनपा १६, भिवंडी निजामपूर मनपा १, मीरा भाईंदर मनपा १, वसई विरार मनपा ४, पनवेल मनपा ३, नाशिक १७, नाशिक मनपा १०, अहमदनगर ३५, अहमदनगर मनपा १६, जळगाव १९, जळगाव मनपा १०, नंदुरबार १, पुणे ४, पुणे मनपा २५, पिंपरी चिंचवड मनपा १, सोलापूर ९, सोलापूर मनपा ३, सातारा ७, कोल्हापूर ३, कोल्हापूर मनपा १, सांगली ४, सांगली मिरज कुपवाड मनपा १, सिंधुदुर्ग ५, जालना ६, हिंगोली १, परभणी १, परभणी मनपा ५, लातूर १०, लातूर मनपा २, उस्मानाबाद १२, बीड ६, नांदेड २३, नांदेड मनपा ११, अकोला २, अकोला मनपा ४, अमरावती ७, अमरावती मनपा २, यवतमाळ १३, बुलडाणा ९, वाशिम ३, नागपूर ११, नागपूर मनपा २३, वर्धा ५, भंडारा ३, चंद्रपूर १, आणि अन्य राज्य/देशातील १ इ. रुग्णांचा समावेश आहे.

पुण्यात सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण

राज्यात पुण्यात सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण असून ही संख्या १ लाख २० हजार ४५२ इतकी आहे. त्याखालोखाल, मुंबईत ८६ हजार ४३३, ठाण्यात ८२ हजार ४७ , नागपूरमध्ये ७२ हजार ८६० उपचाराधीन रुग्ण आहेत. राज्यात बुलडाणा, हिंगोली आणि सिंधुदुर्ग येथे सर्वात कमी उपचाराधीन रुग्ण असून ही संख्या अनुक्रमे १३८३, १८०४,२१२० इतकी आहे.

लहान मुलांच्या बाधित होण्याच्या प्रमाणात वाढ

राज्यात गेल्या दोन महिन्यात ११ वर्षावरील ९९ हजार मुलांना कोरोना झाला आहे. तर १० वर्षाच्या आतील ३८ हजार लहानग्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोवळ्या बालकांमधील संसर्गाचा प्रमाण वाढल्याने चिंता देखील वाढली आहे. १५ फेब्रुवारी ते १५ एप्रिल या कालावधीत ११ ते २० वयोगटातील एकूण ९९ हजार ०२२ मुलं कोरोना संसर्गाने बाधित झाली आहेत तर १० वर्षांपर्यंतची ३८,२६५ लहान मुलांना कोविडने गाठले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांच्या बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे.